बंद

  माध्यान्ह भोजन केंद्रीय स्वयंपाकगृहाचा विस्तार संपुर्ण देशभरात अधिक प्रमाणात वाढावा – राज्यपाल

  प्रकाशित तारीख: February 5, 2020

  माध्यान्ह भोजन केंद्रीय स्वयंपाकगृहाचा विस्तार
  संपुर्ण देशभरात अधिक प्रमाणात वाढावा

  – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

  जालना, दि. 5 – आजची बालके हे उद्याच्या देशाचे भविष्य आहे. गुणवत्तापुर्ण शिक्षण व पौष्टीक आहाराच्या माध्यमातुन संस्कारक्षम व बलवान पिढी घडत असते. समाजभावनेतुन बालकांसाठी सुरु करण्यात आलेल्या माध्यान्ह भोजन केंद्रीय स्वयंपाकगृहाचा विस्तार संपुर्ण देशभरात अधिक प्रमाणात वाढावा, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली.
  महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनी लि. व अन्न अमृत फाऊंडेशन यांच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या माध्यान्ह भोजन योजनेचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज गोल्डन ज्युबली स्कुल परिसरात करण्यात आले. त्याप्रंसगी मार्गदर्शन करताना राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.
  यावेळी महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, अन्नामृत फाऊंडेशनचे राधाकृष्ण दास,महिको मॉन्सेन्टो कंपनीचे आशिया खंड विभागाचे प्रमुख सिमोन थोरस्टेड विबुस्च, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, कैलास गोरंट्याल, नारायण कुचे, नगरध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकजन केवळ स्वत:साठी जगत असतो. परंतू सर्वश्रेष्ठ तोच व्यक्ती आहे जो दुसऱ्यांसाठी जगतो. समाजाप्रती आपलेही काही देणे लागते या भावनेतुन जगणे म्हणजे श्रेष्ठ असल्याचे सांगत अन्नामृत फाऊंडेशनचे राधाकृष्ण दास, व महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले यांनी समाजातील एकही बालक भुकेले राहू नये या दृष्टीकोनातुन माध्यान्ह भोजन योजनेतून बालकांना स्वादिष्ट व पौष्टीक आहार उपलब्ध करुन देत असुन त्यांच्या या कार्याचा समाजातील प्रत्येकाने आदर्श घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
  अन्न अमृत फाऊंडेशनच्या माध्यमातून 21 माध्यान्ह भोजन केंद्रीय स्वयंपाकगृहे चालविण्यात येत असुन 22 व्या केंद्रीय स्वयंपाकगृहाचे लोकार्पण आज येथे करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
  महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले म्हणाले, बालकांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी शिक्षणाबरोबरच पौष्टीक आहार आवश्यक आहे. अन्नामृतच्या माध्यमातुन देशभरातील 13 लक्ष् बालकांना तर जिल्ह्यातील 50 हजार बालकांना अन्न उपलब्ध करुन देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील एक लक्ष बालकांना अन्न उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचे सांगत पद्मश्री डॉ. बद्रीनारायण बारवाले यांनी पाहिलेले स्वप्न आज या निमित्ताने पुर्ण होत असल्याचे सांगत या उपक्रमास सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राधाकृष्ण दास यांनी अन्नामृत फाऊंडेशन करत असलेल्या कार्याची विस्तृत अशी माहिती दिली. यावेळी महिको मॉन्सेन्टो कंपनीचे आशिया खंड विभागाचे प्रमुख सिमोन थोरस्टैड विबुस्च, नगरध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल यांनीही मनोगत व्यक्त केले.
  तत्पूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माध्यान्ह भोजन केंद्रीय स्वयंपाकगृहाची पहाणी करुन विद्यार्थ्यांना स्वत: भोजन वाढले. कार्यक्रमादरम्यान केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रावसाहेब दानवे तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांचे शुभेच्छा संदेशही उपस्थितांना दाखविण्यात आले.
  कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला यांची उप‍स्थिती होती.
  *******