बंद

  महाराष्ट्राला कृषी क्षेत्रातील आदर्श राज्य बनवूया – राज्यपाल चे. विद्यासागर राव

  प्रकाशित तारीख: February 14, 2019

  महाराष्ट्राला कृषी क्षेत्रातील आदर्श राज्य बनवूया

  – राज्यपाल चे. विद्यासागर राव

  पुणे दि. 14 : भारत हा कृषी प्रधान देश असून देशाचा विकास हा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना समृध्द आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शाश्वत शेती, सेंद्रिय शेती,बागकाम, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया, कृषी निर्यात, जल संरक्षणासह कृषी क्षेत्रात आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राला आदर्श राज्य बनविण्याचे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज केले.

  श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे-बालेवाडी येथे कृषी व फलोत्पादन विभागाच्यावतीने सन 2015 व 2016 मधील कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व अधिकारी यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते विविध पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी व फलोत्पादन, महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषि व फलोत्पादन विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे आयुक्त सुहास दिवसे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित होते.

  राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले, शेतकऱ्यांचे कल्याण आणि शेतीचा विकास देशाच्या विकासाशी निगडीत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ‘प्रधानमंत्री कृषी सन्मान योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील 12 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तर राज्यातील सुमारे 80 टक्के शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हा शासनाचा मोठा निर्णय आहे.

  सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे उद्दीष्ट असून त्यादृष्टीने सरकारने काही पावले उचलली आहेत. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले असून मोफत माती परीक्षणाचा मोठा उपक्रम महाराष्ट्र शासनाने राबविला असल्याचे सांगत राज्यपाल म्हणाले, शासनाने आतापर्यंत 77 लाखांहून अधिक मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप केले आहे.

  अनियमीत पाऊस आणि लहरी हवामानावर मात करण्यासाठी जलस्रोतांचे सुयोग्य व्यवस्थापन, जल पुनर्भरण या उपक्रमांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक क्षेत्राला पाणी देवून ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’चे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

  फळबाग लागवडीत महाराष्ट्र अग्रगण्य असून हापूस आंबा, द्राक्षे, केळी, डाळींब आणि नागपूर संत्रा या फळांच्या उत्पादनासह निर्यातीत राज्य प्रथम क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांच्या उत्पदनाला मूल्यवर्धीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील कृषी विद्यापीठातून उत्कृष्ट संशोधन आणि नवकल्पनांची निर्मिती होत असल्याने कृषी विद्यापीठांचा कुलपती म्हणून अभिमान असल्याचे सांगत विद्यापीठातील हे ज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले.

  कृषी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मातीची सेवा करणाऱ्यांचा सन्मान होत असल्याचा आज विशेष आनंद आहे. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील माती तपासून माती परीक्षणाची मोठी चळवळ उभी केली आहे. त्याच प्रमाणे राज्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करून 40 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत 16 हजार गावे पाणीदार झाली आहेत. राज्यात दीड लाख शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली असून ठिबक सिंचनाला प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देवून कर्ज माफी योजना यशस्वीपणे राबविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

  यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन 2015 व 2016 मधील कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील 112 शेतकरी व अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. आभार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मानले. यावेळी कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  *****