बंद

  ध्वजदिन निधी संकलन करणाऱ्यांचा सत्कार सैनिकांसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे देशकार्य – राज्यपाल कोश्यारी

  प्रकाशित तारीख: December 7, 2019

  अंतिम दिनांक:31.12.2019

  ध्वजदिन निधी संकलन करणाऱ्यांचा सत्कार सैनिकांसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे देशकार्य – राज्यपाल कोश्यारी

  मुंबई दि. 7 : आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने यामध्ये आपला अधिकाधिक सहभाग द्यावा असे आवाहन राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

  माजी सैनिक कल्याण विभागाच्यावतीने सह्याद्री अतिथीगृह येथे सशस्त्र सेना ध्वजदिन 2019 निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सशस्त्र सेना ध्वज दिन संकलनात महत्वपूर्ण सहभाग देणाऱ्यांचा राज्यपाल महोदय आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांना सशस्त्र सेना दिवसाचे बॅचेस लावण्यात आले आणि ध्वजदिन निधीत सहभाग देणाऱ्यांकडून निधी संकलित करण्यात आला.

  राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले, आपण सर्वांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी संकलन करणे हे समाजातील मोठे योगदान आहे. आज याच सैनिकांमुळे आपण सुरक्षित असून सैनिकांच्या कुटुंबांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्ताने संकलित केलेला निधी सैनिक, माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येतो. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी ध्वजदिनी निधी संकलनात पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपाल महोदयांनी यावेळी केले.

  या कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सतीश जोंधळे, व्हाईस ॲडमिरल अजित कुमार, मेजर जनरल राज सिन्हा, ग्रुप कॅप्टन एस.एन.बावरे, सैनिक कल्याण विभागाचे संचालक के.लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित होते.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री. बोरीकर यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनाकरिता देण्यात आलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण केल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. जोंधळे यांनी सैन्य दला प्रती आदरभावना दर्शविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून सर्वांनी अधिकाधिक सहभाग द्यावा असे आवाहन केले.