Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

21.08.2019

अभ्यासक्रमामध्ये वारसा जतनाबाबत अध्याय असणे आवश्यक - राज्यपाल

मुंबई दि. 21 : आपल्या शहरातील प्रत्येक वारसा असलेल्या इमारती  या आपल्या सर्वांसाठी वारसा रूपाने मिळालेला खजिना आहे. याचे जतन आणि संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. वारसा म्हणजेच (हेरिटेज) असलेल्या इमारतीत वापरलेली प्रत्येक वीट आणि प्रत्येक दगड आपला आहे. ज्या भूमीवर वारसा असलेल्या इमारती उभ्या आहेत ती भूमी आपली आहे. विद्यार्थ्यांमध्ये आपल्या वारशाबद्दल अभिमान व आपुलकीची भावना निर्माण होण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये वारसा जतनाबाबत अध्याय असणे आवश्यक असल्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई क्लॉक टॉवर आणि राजाबाई टॉवर लायब्ररी येथील ग्रंथालय इमारतीच्या पुनर्संचय आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार प्रदान समारंभ राज्यपाल श्री. राव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर, युनेस्कोचे (भारतातील) संचालक एरिक फाल्ट, भारतीय हेरिटेज सोसायटीच्या अध्यक्षा अनिता गरवारे, एन.जी. सुब्रमण्यम,मुख्य वास्तु विशारद डॉ. ब्रिंदा सोमय्या, कुलसचिव अजय देशमुख इतर मान्यवर आणि सांस्कृतिक वारसा प्रेमी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.राव म्हणाले, वारसा संवर्धन प्रकल्पात आर्थिक सहाय्याइतकेच महत्त्व लोकसहभागाला आहे. राजभवन येथील बंकरच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना वारसा चळवळीत सामील करुन घेऊन शहराचा इतिहास आणि वारसा यावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार केला पाहिजे. याचबरोबर ग्रंथालयाची इमारत जतन करणे पुरेसे नाही. आपण संपूर्ण लायब्ररीचे डिजिटलायझेशन करून ती सर्वांसाठी उपलब्ध करुन दिली पाहिजे.

१६२ वर्ष जुन्या असलेल्या मुंबई विद्यापीठाचा कुलपती म्हणून राजाबाई क्लॉक टॉवर आणि विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या जीर्णोद्धारासाठी मिळालेला सांस्कृतिक वारसा संवर्धनाचा एशिया पॅसिफिक पुरस्कार स्विकारताना मोठा सन्मान वाटतो.  युनेस्कोकडून हा पुरस्कार मी मुंबई विद्यापीठ,नागरिक आणि वारसा प्रेमींच्या वतीने स्वीकारतो. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महानगरपालिका मुख्यालय, घारापुरी लेणी,छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, सायनागॉग्यू चर्च, मशिदी आणि मंदिरे यासारखी जागतिक वारसा स्थळे मिळाली आहेत. तसेच आपल्याला जुनी सरकारी घरे, बंदर, किल्ले, डॉक्स, एशियाटिक लायब्ररी, कस्टम हाऊसेस, बॅलार्ड इस्टेट, हायकोर्टाची इमारत,ग्रंथालयाची इमारत आणि अशा इतर अप्रतिम इमारती मिळाल्या आहेत. या सर्वांचे वारसा-पर्यटन सर्किट विकसित करणे आवश्यक आहे. आधुनिक माध्यमांच्या मदतीने आपण आपल्या वारशाची जाहिरात करुन जगापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेच्या १५० व्या वर्षाच्या उत्सवाचे उद्घाटन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले होते, जोपर्यंत आपल्याला आपल्या वारसा आणि संस्कृतीचा अभिमान वाटत नाही तोपर्यंत आपण तो जतन करण्याचा आग्रह धरणार नाही. त्यामुळे मला सुध्दा हाच प्रश्न आहे की आपण हे का करू शकत नाही? यासाठी दोन गोष्टी कारणीभूत असू शकतात. एकतर आम्हाला आपल्या वारसा आणि संस्कृतीचा पुरेसा अभिमान वाटत नाही आणि म्हणूनच तो टिकवून ठेवण्याची आमची इच्छा होत नाही. किंवा, आपण कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करण्यासाठी स्वतःच्या दैनंदिन जीवनात व्यस्त आहोत. बऱ्याच कॉर्पोरेट आणि व्यावसायिक संस्था त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून वारसा( हेरिटेज साईट) जपण्यासाठी आनंदाने पाठिंबा देतील असेही राज्यपाल श्री.राव यावेळी म्हणाले.

वारसा जतन आणि संवर्धनाबाबत शिक्षण देणे आवश्यक -- विनोद तावडे

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. तावडे यावेळी म्हणाले की, मुंबई आणि राजाबाई टॉवर हे एक समीकरण आहे. वन क्लॉक टॉवर अशी याची ओळख आहे. आज मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई क्लॉक टॉवर आणि राजाबाई टॉवर लायब्ररीला युनेस्कोकडून मिळालेला पुरस्कार हा अत्यंत महत्वाचा आहे. येणाऱ्या काळात मुंबई विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वारसा जतनाबाबत शिक्षण् देण्यासाठी याबाबत अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. वारसा जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असून यासाठी विद्यार्थी, नागरिक यांनी सामूहिक पध्दतीने योगदान देणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संवर्धन आणि विकास झाल्यास महाराष्ट्रातील वारसा पाहण्यासाठी पर्यटक येतील आणि यामुळे महाराष्ट्रातील लोकांना रोजगार मिळतील असा विश्वास युनेस्कोचे (भारतातील) संचालक एरिक फाल्ट यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर तसेच विद्यापीठाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन राज्यपालांनी केले. तसेच दुरुस्ती व जीर्णोद्धार काम पार पाडण्यासाठी इंडियन हेरिटेज सोसायटीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या श्रीमती अनिता गरवारे, डॉ. ब्रिंडा सोम्या आणि इतरांचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्यपालांनी कौतुक केले.

००००