लठ्ठपणा हे आरोग्य क्षेत्रापुढील गंभीर आव्हान - राज्यपाल चे. विद्यासागर राव
लठ्ठपणा हे आरोग्य क्षेत्रापुढील गंभीर आव्हान
- राज्यपाल चे. विद्यासागर राव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ओबेसिटी मंत्र’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई, दि. 11 :
लठ्ठपणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. काहीवेळा
लठ्ठ माणूस चेष्टेचा विषय ठरतो, त्याला
त्याचा कमीपणा वाटतो. शहरी भागात मधूमेह, हृदयविकार, रक्तदाब
हे आजार वाढत आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. लठ्ठपणा हे आरोग्य
क्षेत्रापुढील गंभीर आव्हान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी
आज केले.
राजभवन येथे विश्वकर्मा पब्लिकेशन प्रकाशित व लेखिका डॉ.जयश्री तोडकर व
पत्रकार संतोष शेनॉय लिखित ‘ओबीसिटी
मंत्र’ या पुस्तकाच्या
प्रकाशनप्रसंगी राज्यपाल श्री. राव बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी
शुक्ला, मुंबई पोर्ट ट्रस्टचे
उपाध्यक्ष यशोधन वणगे,
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी
दराडे, ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन
थोरात, प्रशांत पवार, हिरानंदानी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
चटर्जी, मॉरिस फाऊंडेशनच्या मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. उमा कुलकर्णी, पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. शंकरराव तोडकर, जेटी फाऊंडेशनचे सचिव डॉ. हेमंत तोडकर आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. राव म्हणाले, आपला
देश हा 29 वर्षांखालील तरुणांचा देश
म्हणून ओळखला जातो. लठ्ठपणा आणि बदलती जीवनशैली यांच्याशी संबंधित विकारामुळे युवा
वर्गाचे फार मोठं नुकसान होईल. त्यांच्यात जागृती आणायला हवी. जागतिक
आकडेवारीनुसार 39 टक्के प्रौढ व्यक्ती
अतिरिक्त वजनाच्या असून यातील 13
टक्के लोक लठ्ठपणाशी झुंज देत आहेत. यामुळे सक्तीने प्रत्येक शाळांमध्ये शैक्षणिक
सत्राच्या सुरुवातीला वैद्यकीय शिबीर आयोजित करून मुलांमध्ये लठ्ठपणा व योग्य आहार
याबाबत जागृती करावी. यासोबत मोफत दंत चिकित्सा शिबीराचे आयोजनही करावे, अशी सूचनाही राज्यपाल यांनी केली.
‘मिशन यंग आणि फिट इंडिया’ याबाबत राज्यातील प्रत्येक विद्यापीठात जागृती करण्याबाबत भारतरत्न व माजी
क्रिकेटर सचिन तेंडूलकर यांनी सांगितले होते, प्रत्येक युवा, विद्यार्थी, व्यक्तीने दररोज एक तास खेळासाठी द्यायला हवा, याचाही अंमल त्वरित व्हायला हवा, असेही राज्यपाल म्हणाले.
लठ्ठपणाबद्दल जागृती करीत असलेल्या पुस्तकाच्या लेखिका डॉ. तोडकर व श्री.
शेनॉय यांना राज्यपाल श्री. राव यांनी शुभेच्छा दिल्या. जागतिक लठ्ठपणाविरोधी
दिनानिमित्त हे पुस्तक येत असून साध्या भाषेतून सर्वांना समजेल असे आहे, असेही राज्यपाल म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी लठ्ठपणाबाबत टास्क फोर्स स्थापन
केल्याबद्दल राज्यपाल श्री. राव यांनी त्यांचे अभिनंदन केले. शिवाय याचा नियमितपणे
आढावा घेण्याबाबत सूचित केले.
राज्यात मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट सुरु करणार- मुख्यमंत्री
याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ओबेसिटी मंत्र हे पुस्तक सर्व वयोगटातील व्यक्तींना महत्त्वाचे आहे.
लठ्ठपणा (ओबेसिटी) हा आजार आहे हे आपणास माहीत नव्हते. यावर जागृती करण्याचं व
सामान्यांना माहिती देण्याचे काम डॉ. तोडकर व त्यांची जेटी फाऊंडेशन ही संस्था
करीत आहे. त्यांच्याबरोबर टास्क फोर्स स्थापन करून विशेषत: चाईल्ड ओबेसिटीवर शासन
पातळीवर त्वरित कार्यवाही करण्यात येईल. शिवाय मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट सुरु
करण्यासाठी शासन पुढाकार घेणार आहे. या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.
खाण्याच्या पद्धती, जीवन
पद्धती, व्यायाम कसा असावा, आहार कोणता टाळावा, याची माहिती या पुस्तकातून मिळते. लठ्ठपणाबद्दल वैज्ञानिक महत्व पटवून
दिल्यास लोकांना त्वरित याबाबतची गंभीरता समजेल. लठ्ठपणाशी झगडणाऱ्या कुटुंबाला हे
पुस्तक मैलाचा दगड ठरेल. डॉ. तोडकर यांच्या लठ्ठपणाबाबतच्या लढ्यांशी शासन सोबत
असल्याची ग्वाही मुख्यंमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.
मोठ मोठ्या हॉटेलमध्ये आता मेनूकार्डवर कॅलरी यायला हव्यात. त्यातून काय
खावे हे समजेल. जंक फूडबाबतही समाजात जागृती होण्यासाठी शासनस्तरावर कारवाई
करण्यात येईल, असे सांगून डॉ. तोडकर यांचे
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे कौतुक केले.
डॉ.
हेमंत तोडकर यांनी आभार व्यक्त केले.
0 0 0