Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

05.10.2018

‘तरुण आणि स्वस्थ भारत’ मोहिमेसाठी सचिन तेंडूलकर यांनी घेतली राज्यपालांची भेट

भारत जगातील सर्वात तरुण देश म्हणून उदयाला येत असून २०२० साली ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षाच्या आतील असेल. मात्र दुसरीकडे भारत मधुमेहाची राजधानी होत आहे, तसेच लठ्ठपणामध्ये देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपली तरुणाई तंदुरुस्त आणि स्वस्थ रहावी यासाठी क्रीडा हा विषय शिक्षणात समाविष्ट करावा. शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयापर्यंत सर्वांनी दिवसातून किमान एक तास खेळासाठी द्यावा, तसेच सर्व विद्यापीठांमध्ये तरुण आणि स्वस्थ भारत मोहीम राबवावी अशी विनंती भारतरत्न सचिन तेंडूलकर यांनी आज येथे केले.

          सचिन तेंडूलकर यांनी गुरुवारी (दिनांक ४) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

          विद्यापीठांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल राज्यपालांनी सचिन तेंडूलकर यांचे अभिनंदन केले तसेच मोहिमेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तरुण आणि स्वस्थ भारतअभियानासाठी कॉर्पोरेट जगताचा सामाजिक दायित्व निधी देखील मिळू शकेल असे त्यांनी सांगितले. आदिवासी बहुल क्षेत्रामधील खेळाडूंना मदत करण्याच्या सचिन तेंडूलकर यांच्या भूमिकेचे देखील राज्यपालांनी स्वागत केले.

मे महिन्यात सचिन तेंडूलकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट देऊन तरुण आणि स्वस्थ भारतअभियान राबविण्याबद्दल पुढाकार घेतला होता. हे अभियान राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये राबवावे या दृष्टीने तेंडूलकर यांनी राज्यपालांशी चर्चा केली. 

          भारत हा क्रीडाप्रेमी देश असून आता प्रत्यक्ष खेळणारा देश झाला पाहिजे. लहान मुलांमधील क्रीडा नैपुण्य हेरणारे उत्तम प्रशिक्षक देशाला हवे आहेत. देशात अनेक निवृत्त खेळाडू आहेत. त्यांच्या सेवा प्रशिक्षक म्हणून वापरल्या जाव्यात, असेही मत तेंडुलकर यांनी व्यक्त केले.

          यावेळी क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्ण, उच्च व तंत्र शिक्षण सचिव सौरभ विजय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, क्रीडा पत्रकार सुनंदन लेले, डॉ. जयश्री तोडकर हे देखील बैठकीला उपस्थित होते.