Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

14.09.2018

अंध - दिव्यांग व्यक्तींच्या समस्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन

दृष्टिहीन आणि दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रलंबित समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आपण लवकरच संबंधित मंत्र्यांसह अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून समस्यांचा पाठपुरावा करू असे आश्वासन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे दिले.

 

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड या संस्थेच्या वतीने दृष्टिहीन व्यक्तींच्या राष्ट्रीय ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे शुक्रवारी (दिनांक १४) पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते.   

अंध व्यक्तींना मतदानाचा हक्क स्वतंत्रपणे बजावता यावा यासाठी त्यांना ब्रेल लिपीमध्ये मतपत्रिका उपलब्ध करून देण्याच्या विनंतीबाबत संस्थेने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करावा अशी सूचना राज्यपालांनी केली.

डिजिटल इंडियाअभियानात दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात परिवर्तन आणण्याची क्षमता आहे असा उल्लेख करून नॅब या संस्थेने दृष्टिहीन व्यक्तींना डिजिटल इंडिया अंतर्गत रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

सर्व महानगर पालिका, नगर परिषदा व जिल्हा परिषदांनी आपल्या अर्थसंकल्पातील पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी वापरावा तसेच दृष्टिहीन व्यक्तींना सवलतीच्या दरात शिवशाही बसने प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी यावेळी केली.

 

कार्यक्रमाला नॅबचे उपाध्यक्ष सूर्यभान साळुंके, मानद सचिव गोपी मयूर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.