Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

30.05.2018

पुणे शहराचा शैक्षणिक वारसा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

महान्यूज                       बुधवार, ३० मे, २०१८

पुणे शहराचा शैक्षणिक वारसा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

 

पुणे : पुणे शहराचा शैक्षणिक वारसा हा येथील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून अखंड भारत देशात प्रसिद्ध आहे. पुणे शहराच्या नावलौकिकात भर पाडण्यासाठी साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल उत्कृष्ट योगदान देईल, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.


साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती श्री.कोविंद बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, दादा जे. पी. वासवानी, रत्ना वासवानी आदी उपस्थित होते.


राष्ट्रपती श्री. कोविंद म्हणाले, आधुनिक भारताच्या जडण-घडणीमध्ये शिक्षणाचा मोठा वाटा आहे. या शिक्षण संस्थेस मोठा इतिहास आहे. विद्यार्थ्यांमध्ये फक्त पाठ्यपुस्तकी शिक्षणाऐवजी चांगले संस्कार रूजविणे गरजेचे आहे. आधुनिक भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी याच पुणे शहरात घातला. शिक्षकांनी दिलेले ज्ञानच विद्यार्थ्याची खरी ओळख असते. साधू वासवानी शाळेतून देश सेवेसाठी चांगले नागरीक घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी शुभेच्छापर भाषणात येथे येऊन आनंद झाल्याचे सांगितले.


केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री.जावडेकर म्हणाले, गुणांची टक्केवारी यामध्ये निर्माण झालेली स्पर्धा घोतक आहे. विद्यार्थी आज मैदानात खेळायला जात नाहीत. अभ्यासक्रमाच्या ओझ्याखाली विद्यार्थी राहू नयेत म्हणून लवकरच नवीन शिक्षण पद्धती आणण्यात येईल. जीवनाचे शिक्षण देणारे मंदिर म्हणजेच शाळा असते, असे ते म्हणाले.


दादा जे. पी. वासवानी यांनी आपल्या भाषणात शाळा स्थापनेचा उद्देश सांगितला. नवीन शिक्षण पद्धतीमुळे मानवतेचा विकास होण्यास मदत होत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक साधू वासवानी मिशनच्या गुलशन गिडवानी यांनी केले. आभार शाळेच्या प्राचार्या श्रीमती आरती पाटील यांनी मानले.