Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

30.05.2018

मातोश्री रमाबाई यांचे जीवन भारतीय महिलांना प्रेरणादायी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिप्रादन : पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

महान्यूज                                                                                           दि. 30 मे 2018

 

 

मातोश्री रमाबाई यांचे जीवन भारतीय महिलांना प्रेरणादायी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिप्रादन : पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

 

पुणे दि. 30 : मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनाकडून प्रत्येक भारतीय महिलेने प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले.

            पुणे महानगरपालिकेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानात मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या  हस्ते अनावरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर ,सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, श्रीनाथ भीमाले आदी उपस्थित होते.

            राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय असे आहे. रमाबाई यांनी केलेला त्याग त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली साथ, प्रेरणा आणि त्यांच्या संघर्षाच्या काळात दिलेला पाठिंबा अतिशय कौतुकास्पद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वविख्यात बनवण्यात निर्णायक वाटा रमाबाई आंबेडकर यांचा आहे.

            राष्ट्रपती कोविंद म्हणाले  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रमाबाई यांच्यावर अतिशय प्रेम  होते. त्यांनी आपले   थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तकही रमाबाई ह्यांना अर्पण केले आहे. या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेतून त्यांच्या रमाबाई यांच्यावरील प्रेमाची अनुभूती येते.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल मांडून महिलांना अधिकार देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नेहमी महिलांचे अधिकार आणि सबळीकरण याचा विचार मांडला. त्यांच्या या विचारापाठीमागे मातोश्री रमाबाई यांची प्रेरणा होती, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.

            यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यमंत्री रामदास आठवले यांचीही भाषणे झाली. महापौर मुक्ता टिळक यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शाल आणि पुणेरी पगडी देऊन सत्कार केला. उपमहापौर सिध्दार्थ  धेंडे यांनी  आभार मानले. यावेळी खासदार वंदना चव्हाण, आमदार नीलम गोऱ्हे, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदी उपस्थित होते.

0 0 0