Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

26.02.2018

मराठीच्या संवर्धनासाठी जागतिक मराठी परिषद आयोजित करणे उपयुक्त ठरेल - राज्यपाल चे. विद्यासागर राव

महान्यूज सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

 

मराठीच्या संवर्धनासाठी जागतिक मराठी परिषद आयोजित करणे उपयुक्त ठरेल

- राज्यपाल चे. विद्यासागर राव

 

मुंबई : महाराष्ट्रात जागतिक मराठी परिषदेचे आयोजन केल्यास मराठीच्या संवर्धनासाठी विचारमंथन होऊ शकेल, असे मत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केले.


मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला राजभवनच्या हिरवळीवर साहित्यिकांशी अनौपचारिक संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, २०१७ चा विंदा करंदीकर मराठी भाषा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेले ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.


मातृभाषेला समृद्ध करण्यासाठी साहित्यिकांसोबतच सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सांगून राज्यपाल श्री. राव म्हणाले, पुढे मराठीच्या विविध बोलीभाषेतील छोट्या छोट्या गोष्टी असलेल्या एकाच १०० पाणी पुस्तके तयार करून वाटल्यास खूप चांगला परिणाम होईल. संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेकडून (युनेस्को) मातृभाषेच्या महत्वाविषयी संशोधन सुरू आहे. मराठीला समृद्ध करण्याचे काम संतांनी केले आहे. भाषेच्या प्रभावी वापराचा संपूर्ण जगावर परिणाम करतो.

राज्यपाल पुढे म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सतत कार्यरत राहिले पाहिजे. पुढील काळात राजभवनमध्ये मराठी कवितांचा कार्यक्रम आयोजित करू, असेही ते म्हणाले.

श्री. तावडे म्हणाले, मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला मराठी भाषेविषयी विविध अंगांनी विचारविनिमय करण्यासाठी साहित्यिकांशी अनौपचारिक चर्चेचा कार्यक्रम ठेवण्याचा विचार केला. यापुढे यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा विजया वाड, साहित्यिक अरुणा ढेरे, बाबा भांड, रामदास भटकळ, मोनिका गजेंद्रगडकर, प्रेमानंद गज्वी, महेश केळुस्कर, डॉ. शिरीष देशपांडे, अभिनेते किशोर कदम तथा कवी 'सौमित्र' यांनी आपले विचार मांडले.