Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

11.02.2018

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठाचा विसावा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

महाराष्ट्र शासन

जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

                      दि. 11 फेब्रुवारी , 2018


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठाचा  विसावा  दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

 

विद्यार्थ्यांमध्ये आपण समाजाचे देणे लागतो ही भावना प्रबळ होणे गरजेचे

२० व्या दीक्षान्त समारंभात प्रसिध्द मानसशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र मुटाटकर यांचे प्रतिपादन

 

विज्ञानशाखेने उद्योगाशी संबंधित संशोधन करणे गरनेचे आहे. तसे मानव्यविद्याशाखा आणि सामाजिकशास्त्रे यांनी समाज उपयोगी उपक्रमात सहभाग घ्यावा. अशा परस्परपूरक उपक्रमामुळे मानवी जीवन समृद्ध होईल. यासाठी विद्यार्थ्यामध्ये आपण समाजाचे देणे लागतो ही भावना प्रबळ होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सुप्रसिध्द मानवशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र मुटाटकर यांनी केले.

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा विसावा दीक्षान्त समारंभ आज रविवार, दि.११ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. चे. विद्यासागर राव हे होते. यावेळी मंचावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर आणि प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे यांच्यासह अधिष्ठाता डॉ. वामनराव जाधव, प्राचार्य डॉ. व्ही. के. भोसले, प्राचार्य डॉ. जे. एम. बिसेन, डॉ. एस. जी. के. कृष्णमाचार्युलू, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. ज्ञानेश्वर पवार, परमेश्वर हसबे, कुलसचिव डॉ.रामजान मुलानी, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि. एन. सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

आपल्या दीक्षान्त भाषणात डॉ. मुटाटकर यानी विद्यापीठाच्या विकासाचा कृती आराखडा विद्यापीठास मिळालेला दर्जा, किनवट येथील आदिवासी संशोधन केंद्राचे काम, विद्यापीठातील संकुल पद्धती, श्रेयांक पद्धतीचा अंगीकार व आंतर विद्याशाखीय अभ्यास प्रोत्साहन आदी बाबींचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला. ते म्हणाले की, आदिवासींचे आरोग्यज्ञान समृध्द आहे. पण त्यांच्या ज्ञान आणि कौशल्याला मान्यता नाही. जन आरोग्याच्या उपक्रमात त्यांना स्थान नाही. आदिवासींच्या ज्ञानाचा उपयोग औषधनिर्माणासाठी केला पाहिजे त्यासाठीमहाराष्ट्र असोसिएशन ऑफ अँर्थॉपॉलॉजीकल सायन्सेसही संस्था कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

आदिवासी समाजात स्त्रीभ्रूण हत्या होत नाहीत, तर प्रगत समजल्या जाणाऱ्या आपल्या समाजात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्त्रीचा गर्भ पोटातच संपवून टाकल्या जात आहे. आदिवासींची जगण्याची समृद्ध परंपरा आहे ती आमच्या शिक्षण आणि संशोधनाचा विषय कधी होणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासाठी राजभवनातील आदिवासी व शिक्षण विभागाने नांदेड, जळगाव आणि गोंडवाना विद्यापीठातील आदिवासी केंद्राचा संवाद घडवून आणावा,अशी अपेक्षा डॉ. मुटाटकर यांनी व्यक्त केली.

 

डॉ. मुटाटकर म्हणाले की, शेतकरी आत्महत्या ह्या केवळ आर्थिक विवंचेनेतून होत नसून त्यास राजकीय संदर्भ आहेत. तसेच या आत्महत्यांमागे सांस्कृतिक पार्श्वभूमी देखील आहे. आयुष्यभर दारिद्रयात पिचलेले लोक आत्महत्या करीत नाहीत तर तात्कालीक दारिद्र्यामुळे शेतकरी मात्र आत्महत्या करतो, या मागील मानसिकता समजून घेतल्याशिवाय या समस्येचे निशकरण करता येणार नाही. अशा सगळ्याच समकालीन प्रश्नांची सोडवणूक ही बहुविद्याशाखा व आंतरविद्याशाखा संशोधानातून साधता येईल, असे त्यांनी सांगितले.

 

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठाचा अहवाल सदर केला, विद्यापीठापुढे गुणवत्तावाढ, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण, नवीन अध्ययन आणि अध्यासन पद्धतीचा अवलंब करणे अशी आव्हाने उभी आहेत हे सांगून विद्यापीठाने यादृष्टीने शिक्षण, संशोधन, विद्यार्थी आणि मुलभूत सुविधांचा विकास या बाबतीत मागील साडेचार वर्षात विद्यापीठाने केलेल्या भरीव कामगिरीचा उल्लेख केला. शैक्षणिक उदासीनतेचे अंधारातून बाहेर पडून हे विद्यापीठ उत्कृष्टतेकडे वाटचाल करीत आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

उन्हाळी २०१७च्या परीक्षेत एैश्वर्या जोशी (एम.बी.ए.), सीमा बेगम (एम.एस्सी.भौतिकशास्त्र) या विद्यार्थिनींना तीन तर आयेशा बेगम (एम.एस्सी.प्राणिशास्त्र),ताफिल दुराणी (एम.एस्सी.रसायनशास्त्र),गुणवंत सरोदे (पत्रकारिता पदव्युत्तर, एम.ए./ एम.सी.जे./ एम.एस्सी.इलेक्ट्रॉनिक्स मेडिया या विषयांमध्ये माध्यमशास्त्र संकुलात प्रथम),ममता यादव (एम. ए. राज्यशास्त्र), अस्मिता बुरसे (बी.कॉम.), भारत सुरवसे (बी.ए.राज्यशास्त्र) या विद्यार्थ्यांना दोन सुवर्णपदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रियंका यादव (एम.एस्सी.कॉम्प्युटर), आरती रणखांब (बी. एस्सी. वनस्पतीशास्त्र), हिना महेबूब (एम.एस्सी.वनस्पतीशास्त्र), नवनाथ गंजवे (बी.ई.यांत्रिकी), सभेवाल साहेबा (एम.सी.ए.),दिनेश चाटसे (बी.एस्सी.इलेक्ट्रॉनिक्स),प्रियंका केंद्रे (बी.ई.इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन), सलाम बेग (बी.एस्सी.रसायनशास्त्र), फिरदोस बागवान (एम.ए.हिंदी), शीतल अडकिणे (बी.एस.एल.-एल.एल.बी.), स्वप्नील चौधरी (एम.ए.अर्थशास्त्र), श्रध्द्दा पेदे(बी.एस्सी.सुक्ष्मजीवशास्त्र), पूजा मालू (विधी),तानाजी कांबळे (बी.ए.भूगोल), हेमा सिरसाठ(एम.ए.इतिहास), राम शिवपुंजे (बी.कॉम. मुलांमध्ये सर्वप्रथम), वैशाली बासटवार(एम.एस्सी.गणित), उपासना पांडे(एम.ए.अर्थशास्त्र), प्रज्ञा मोरे (एम.ए.समाजशास्त्र), कल्पना टेकाळे(एम.ए.तत्वज्ञान), राधिका पवार (एम.ए.लोकप्रशासन), शेख फहाद (एल.एल.एम. बिझनेस लॉ), हर्षा जावली(बी.एस्सी.सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग), वमा लापसिया (बी.एस्सी.जैवतंत्रज्ञान), सुरजकुमार पवार (एम.एस्सी.सॅन), चैताली कानोटे (एम.ए.मराठी), प्रिया बोराडे (बी.सी.एस.), सुजीत देशमुख (बी.सी.ए.), प्रियांका धुमाळ (एम.ए.मानसशास्त्र) यांचा यावेळी सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला. 

 

दीक्षान्त समारंभाच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रमाणपत्र कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर आणि प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे,कुलसचिव डॉ.रामजान मुलानी, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि. एन. सरोदे, व्यवस्थापन परिषद सदस्य,सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि विद्या परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत २३६ विद्यार्थ्यांना पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आले.

 

समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. माधुरी देशपांडे आणि डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी शिक्षण, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये अत्याधुनिक सुविधांनीयुक्त नव्याने बांधण्यात आलेल्या इंडोअर स्पोर्ट्स हॉलचे सर्वप्रथम विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर आणि प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. ज्ञानेश्वर पवार, परमेश्वर हसबे, कुलसचिव डॉ.रामजान मुलानी, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि. एन. सरोदे, उच्च शिक्षण नांदेड विभागाच्या सहसंचालिका डॉ. शैलाजा सारंग, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, कार्यकारी अभियंता अरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.