Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

28.12.2017

भारत-अफगाणिस्तानचे उद्योग व्यापार संबंध अधिक वृध्दिंगत व्हावेत - राज्यपाल

मुंबई, दि.28: काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरु झाल्याने अफगाणिस्तान आणि भारताचे उद्योग-व्यापारविषयक संबंध अधि वृध्दिंगत होतील असा विश्वास राज्यपाल सी.विद्यासागरराव यांनी आज व्यक्त केला.

राजभवन येथे अफगाणिस्तानच्या वाणिज्‍य शिष्टमंडळाने राज्यपाल यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. विद्यासागरराव म्हणाले, अफगाणिस्तान आणि भारताचे संबंध प्राचीन आहेत. शेकडो वर्षापूर्वी दोन्ही देशा दरम्यान व्यापार चालायचा. आज पुन्हा त्या जुन्या संबंधाना उजाळा मिळाला आहे. दोन्ही देशात पर्यटनाला चांगला वाव आहे. अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी भारत ठामपणे उभा राहिलेला आहे. राजनैतिक संबंध उत्तमप्रकारे प्रस्थापित झाले आहेत. दोन्ही देशादरम्यान व्यापार विषयक देवाण-घेवाण वाढली पाहिजे. त्यासाठी विविध शहरे विमान सेवेने जोडली पाहिजेत, म्हणजे उद्योग-व्यवसायाला चालना मिळून पर्यटन क्षेत्राचा विकास होईल.

अफगाणिस्तान मधील सुकामेवा (ड्रायफ्रुटस) भारतात प्रसिध्द आहे, तर भारतातील मोती आणि मोत्यांचे दागिने अफगाणिस्तानात प्रसिध्द आहेत. असे सांगून ते म्हणाले, भारताने जवळपास 16 हजार अफगाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली आहे. पुणे,मुंबई आणि अन्य शहरात ते उच्च शिक्षण घेत आहेत. भारताने अफगाणिस्तानात अनेक शाळा सुरु केल्या आहेत. दहशतवाद संपविणे हे दोन्ही देशाचे उद्दिष्ट आहे. व्यापार आणि उद्योग व्यवसायात दोन्ही देशांनी चांगली भरारी घेतली तर अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल.

भारतातील अनेक भाषातील चित्रपटाचे चित्रिकरण हे अफगाणिस्तानात केले जाते. तेथील सुंदर प्रेक्षणीय स्थळांची मोहिनी भारतीयांवर आहे. त्याच बरोबर भारतीय चित्रपटाचा खास शौकीन वर्ग अफगाणिस्तानात आहे. असेही शेवटी राज्यपाल म्हणाले.

प्रारंभी अफगाणिस्तानचे राजदूत मोहमंद झीया सालेही यांनी राज्यपाल विद्यासागरराव यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी कार्गो सेवेद्वारे दाखल फळांची पहिली पेटी राज्यपाल विद्यासागर राव यांना सन्मानपूर्वक भेट दिली. या भेटी दरम्यान अफगाणिस्तान दूतावासातील अधिकारी, व्यापारी शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

काबूलचे सफरचंद मुंबईत

            काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरु झाल्याने फळे आणि भाजीपाला आयात-निर्यातीला चालना मिळणार आहे. कालच जवळपास 40 टन सफरचंद घेऊन अफगाणिस्तानचे विमान मुंबईत दाखल झाले. आता नियमित विविध फळे, सुकामेवा येथील बाजार पेठेत उपलब्ध होणार आहेत. भारतातील केळी आणि द्राक्षाला चांगली मागणी असल्याचे अफगाण शिष्टमंडळाने चर्चा करताना सांगितले.

            अफगाणिस्तानचे व्यापारी शिष्टमंडळ आणि मुंबईतील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांची एकत्रित बैठक घेऊन फळे, भाजीपाला व अन्य जिवनावश्यक वस्तुंची देवाण-घेवाण वाढविण्याबाबत चर्चा घडवून आणण्याच्या सूचना यावेळी राज्यपाल सी.विद्यासागरराव यांनी दिल्या.

            यावेळी सर्वश्री. हाजी मोहमंद (आशिक अफगाण लि.) हाजी फरहार (फरहाद लि.) हाजी सादुद्दीन (खंदा फूड लि.), हाजी अहमद शाह (अल मन्सूर झम झम लि.), मोहमंद अली खान (क्रिस्टाल इन्टरप्राईजेस) आदी उद्योग-व्यापारविषयक शिष्टमंडळातील व्यापाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी राज्यपाल यांचे प्रधानसचिव वेणूगोपाल रेड्डी, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, पणन विभागाचे प्रधानसचिव विजयकुमार आदी उपस्थित होते.

00000

महान्यूज