Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

24.12.2017

मोहम्‍मद रफी हे संगितातील गंधर्व अवतार उपराष्‍ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे गौरवोद्गार


मुंबई, दि. 24 डिसेंबर 2017- 

महान्यूज

*मोहम्‍मद रफी हे संगितातील गंधर्व अवतार*

*उपराष्‍ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे गौरवोद्गार*

*स्‍पंदन आर्टच्‍या मोहम्मद रफी पुरस्‍काराचे शानदार सोहळयात वितरण*


मोहम्मद रफी हे स‍ंगितातील गंधर्व अवतार होते. ते गायक म्‍हणून ही मोठे होतेच तेवढेच ते व्‍यक्‍ती म्‍हणूनही मोठे होते अशा शब्‍दात उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू यांनी मोहम्मद रफी यांचा गौरव केला. तर राज्‍यपाल सी. विद्यासागर राव यांनीही असा मोहम्मद रफी पुन्‍हा होणे नाही अशा शब्‍दात त्‍यांच्‍याबद्दल मनस्‍वी आदर भावना व्‍यक्‍ती केल्‍या.

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार हे संस्‍थापक अध्‍यक्ष असलेल्‍या स्‍्पंदन आर्ट या संस्‍थेतर्फे देण्‍यात येणा-या मोहम्मद रफी पुरस्‍कारांचे वितरण आज उपराष्‍ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्‍या हस्‍ते वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात एका शानदार सोहळयात झाले. यावेळी राज्‍यपाल सी विद्यासागर राव यांच्‍यासह राज्‍याचे सांस्‍कृतीक मंत्री विनोद तावडे, मोहम्मद रफी यांच्‍या यास्‍मीन आणि नसरीन या दोन मुली, तसेच अॅड प्रतिमा शेलार आणि आमदार अॅड आशिष शेलार यावेळी उपस्थित होते.

सन 2017चा दहाव्‍या वर्षीचा महोम्मद रफी जीवन गौरव पुरस्‍कार संगितकार श्रीकांत ठाकरे यांना मरणोत्‍तर देण्‍यात आला असून एका लाख रुपयांचा धनादेश, स्‍मृतीचिन्‍ह व शाल असे या पुरस्‍काराचे स्‍वरूप असून तो श्रीकांत ठाकरे यांच्‍या पत्‍नी मधुवंती ठाकरे यांनी उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू यांच्‍या हस्‍ते स्विकारला. तर मोहम्मद रफी पुरस्‍कार 51 हजार रूपयांचा धनादेश स्‍मृतीचिन्‍ह व शाल हा पुरस्‍कार उपराष्‍ट्रपतींच्‍या हस्‍ते ज्‍येष्‍ठ गायिका पुनम श्रेष्‍ठा यांनी स्विकारला.

यावेळी पुरस्‍काराला उत्‍तर देताना पुनम श्रेष्‍ठा यांनी रफी साहेबांसोबतच्‍या अनेक आठवणींना उजाळा दिला. वयाच्‍या नवव्‍या वर्षी पुनम यांनी मोहम्मद रफी यांच्‍या सोबत पहिले गाणे गायले. त्‍यावेळी रफी साहेबांनी आपल्‍याला जे प्रेम दिले ते आजही विसरता येणार नाही. त्‍यावेळी त्‍यांनी मला शंभर रुपयांचे बक्षीस दिले. त्‍यातून मी एक गोष्‍ट शिकले. आज कोणी लहान बालक चांगला गातो आहे तर मी त्‍याला मदतीचा हात देते असे सांगत पुनम श्रेष्‍ठा यांनी आजपर्यंत मला कोणताही पुरस्‍कार मिळाला नाही. मला पहिला पुरस्‍कार रफी साहेबांच्‍या नावाने आज मिळाला आणि पहिले गाणे मी रफी साहेंबासोबत गायले आता मला अन्‍य कोणताही पुरस्‍कार मिळाला नाही तरी चालेल, अशा भावना व्‍यक्‍त करताच सभागृह टाळयांच्‍या कडकडाने भरून गेले.

तर उपराष्‍ट्रपती यांनी अत्‍यंत मोकळया आणि मनस्‍वी शब्‍दात भाषण करीत उपस्थितांची मने जिंकली. उपराष्‍ट्रपती पदाचा राजशिष्‍टाचार असतो पण मी त्‍याचा फार विचार न करता आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो तो केवळ रफी यांच्‍यावर प्रेम करणारे आमदार अॅड आशिष शेलार यांनी मोहम्मद रफी यांच्‍या प्रेमापोटी. मोहम्मद रफी हे संगितातील ंगंधर्व अवतार होते. आपल्‍या संगितामध्‍ये विलक्षण जादू आहे. ते माणसालाच नाही तर सजिव सृष्‍टीलाच वेड लावते. संगिताच्‍या सहाय्याने उपचार करून रुग्‍णही बरा होतो ऐवढी ताकद संगितामध्‍ये आहे. अशा संगिताच्‍या दुनियेत महम्मोद रफी यांचा आवाज म्‍हणून एक जादूच होती. त्‍यांनी केवळ हिंदी नाही तर मराठी, तेलगू आणि अन्‍य भाषांमध्‍येही अनेक गाणी गायली. पडद्यावर जो अभिनेता जी भूमिका साकारणार असेल त्‍याला साजेसा  त्‍या अभिनेत्‍याच्‍या वया बरोबार जूळणारा सूर मोहम्मद रफी लावायचे. आपली भारतीय संस्‍कृती हे एक समृध्‍द जीवनशैली आहे. संगित हे त्‍याचा एक भाग असून संगितामध्‍ये सर्व जाती धर्माच्‍या माणसांना एकत्र आण्‍याची ताकद आहे अशा शब्‍दात उपराष्‍ट्रपतींनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त्‍ केल्‍या.

तसेच राज्‍यपाल सी. विद्यासागर राव यांनी तर पुरस्‍कार प्राप्‍त दोघांचे अभिनंदन करतानाच बांद्रा हे एक असे उपनगर आहे जेथे सर्वच क्षेत्रातील अनेक नामवंत वास्‍तव्‍यास आहे. बांद्यांचे पर कॅपिटा टॅलेंट सर्वात जास्‍त आहे असे सांगतानाच राज्‍यपालांनी मोहम्मद रफी यांच्‍या सारखा महान कलावंत पुन्‍हा होणे नाही अशा शब्‍दात रफी यांचा गौरव केला.  कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक आमदार अॅड आशिष शेलार यांनी केले. तर सुत्रसंचालन संदिप कोकीळ यांनी केले. त्‍यानंतर प्रसाद महाडकर यांच्‍या जीवनगाणी तर्फे फिर रफी  ही रफी यांच्‍या गाण्‍याची मैफिल सादर करण्‍यात आली. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कार्यक्रमाला रसिकांची प्रचंड गर्दी झाली होती त्‍यामुळे रंगशारदाचे सभागृह तुडुंब भरले होतेच शिवाय तळमजल्‍यावर मोठया पडद्यासमोर बसून कार्यक्रम पाहणा-यांची संख्‍याही मोठी होती.