Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

11.11.2017

राज्यपालांच्या हस्ते डॉ. प्रभा अत्रे यांना कलाशिखर पुरस्कार प्रदान

सावनी शेंडे-साठ्ये व अनल चटर्जी कलाकिरण पुरस्काराने सन्मानित

 

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना शनिवारी आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते तसेच बिर्ला समूहाच्या संचालिका राजश्री बिर्ला यांच्या उपस्थितीत प्रभा अत्रे यांना हा पुरस्कार (रॉयल ओपेरा हाउस, मुंबई येथे) सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

स्मृतिचिन्ह आणि तीन लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

 

शाळांमधून संगीत विषय हद्दपार होत असल्याबद्दल राज्यपालांना चिंता

संगीत हे जीवन आहे. संगीतामुळे मुलांचे व्यक्तिमत्व घडते असे सांगताना अलिकडच्या काळात शाळांमधून संगीत विषय हद्दपार होत असल्याबद्दल राज्यपालांनी आपल्या भाषणात चिंता व्यक्त केली. आज एकीकडे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण संगीत शिक्षणापासून दुरावत चालले आहेत, तर दुसरीकडे युवा कलाकार संगीत क्षेत्रात करिअर करण्यापासून परावृत्त होत आहेत; हे चित्र बदलले पाहिजे, असे मत राज्यपालांनी व्यक्त केले. खासगी तसेच आंतरराष्ट्रीय तसेच शाळांनी विद्यार्थ्यांना संगीत विषय उपलब्ध करून द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने सर्व विद्यापीठांतील संगीत विभागांना नवसंजीवनी देण्याची सूचना आपण कुलगुरूंना करणार असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.     

महाराष्ट्रात संगीताच्या सर्व घराण्यातील कलाकार आहेत. या सर्व परंपरांचे जतन करतानाच संगीत क्षेत्रातील गुरुजन व कलाकार यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी समाज, उद्योग जगत तसेच संगीत कला केंद्रासारख्या संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे असे राज्यपालांनी संगितले.

संगीत साधना पाण्यावरील रेषेसारखी: प्रभा अत्रे

संगीत साधना ही पाण्यावरील रेषेसारखी असल्याचे सांगतानाच कला शिखर पुरस्कार दिल्याबद्दल डॉ. प्रभा अत्रे यांनी आयोजकांचे आभार मानले. आयुष्यभर संगीताचे साधक राहून संगीतातून आपणांस जो आनंद मिळाला तो आनंद रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे सावनी शेंडे-साठये यांनी सांगितले.      

 

सावनी शेंडे-साठ्ये व अनल चटर्जी यांना राज्यपालांच्या हस्ते कलाकिरण पुरकार प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह आणि ७५००० रुपये रोख असे कलाकिरण पुरस्काराचे रूप आहे.

डॉ. प्रभा अत्रे यांना देण्यात आलेला कलाशिखर पुरस्कार यापूर्वी लता मंगेशकर, एम एफ हुसेन, पंडित राम नारायण, हबीब तन्वीर, सांखो चौधरी, तिजनबाई, पंडित भीमसेन जोशी यांना देण्यात आला आहे.

कार्यक्रमाला वासवदत्ता बजाज, संगीत कला केंद्राचे मानद सचिव ललित डागा यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

***