Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

05.11.2017

भारतीय शिक्षण पध्दतीत ज्ञानात्मक शिक्षणावर भर देणे आवश्यक - राज्यपाल चे. विद्यासागर राव

उपसंचालक (माहिती),

विभागीय माहिती कार्यालय,

नवीन मध्यवर्ती इमारत, पुणे-01

भारतीय शिक्षण पध्दतीत ज्ञानात्मक शिक्षणावर भर देणे आवश्यक

-       राज्यपाल चे. विद्यासागर राव

 पुणे, दि. :- राष्ट्राच्या जडणघडणीत संस्थात्मक बांधणी महत्वाची ठरते, यात शिक्षणाला अन्ययसाधारण महत्व आहे. गतीमान युगाच्या गरजा ओळखून विद्यापीठांनी ज्ञानात्मक शिक्षणावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज व्यक्त केले.

            प्रबोधन मंच, पुणे यांच्यावतीने आयोजित ज्ञानसंगम राष्ट्रीय कार्यशाळेत श्री. राव बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रबोधन मंचाचे अध्यक्ष हरी मिराजदार, ज्ञानसंगम परिषदेचे संयोजक डॉ. आनंद लेले, अनिरुध्द देशपांडे, मंचाचे सदस्य किशोर शशितल उपस्थित होते.

            राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले, प्राचिन काळी भारतातील नालंदा, तक्षशीला यांसारखी विद्यापीठे जगभरात ज्ञानदानासाठी प्रसिध्द होती. भारत हा प्राचीन काळापासून ज्ञान देणारा देश म्हणून ओळखला जातो. भारतातील प्राचीन साहित्य आणि विज्ञानाचा अभ्यास होणे आवश्यक आहे.

प्राचीन काळात विविध क्षेत्रात भारताच्या ज्ञान शाखेचा ठसा आपल्याला पहावयास मिळतो. भारतीय वेदात मोठे ज्ञान सामावले आहे. आजच्या काळात शिक्षण घेत असताना केवळ शैक्षणिक पदव्या संपादन न करता ज्ञानात्मक शिक्षणावर भर देणे आवश्यक असल्याचे श्री. राव यांनी सांगितले.

               श्री विनोद तावडे म्हणाले, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अभ्यास करताना कोणत्याही प्रकारच्या गाईडची  गरज भासणार नाही, अशा प्रकारच्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम सुरु आहे. भारतीय परंपरेवर आधारित संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत राज्यशासन विचार करत आहे. ज्ञानसंगम सारख्या राष्ट्रीय परिषदांमधून शिक्षण पध्दतीतील सुधारणांबाबत ठोस सूचना राज्य शासनांकडे सादर केल्यास यावर निश्चित विचार करण्यात येईल.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आनंद लेले यांनी केले. तर आभार किशोर शशितल यांनी मानले. या कार्यक्रमाला ज्ञानसंगमचे देशभरातील सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.

00000