Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

05.11.2017

सौरऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राने अग्रेसर राहावे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची अपेक्षा : राजभवनातील प्रकल्पाचे उद्घाटनविभागीय माहिती कार्यालय,

नवीन मध्यवर्ती इमारत, पुणे-01

 

सौरऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राने अग्रेसर राहावे

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची अपेक्षा : राजभवनातील प्रकल्पाचे उद्घाटन

 

 

पुणे, दि. ५ (विमाका):  सौरऊर्जा निर्मिती आणि वापरात महाराष्ट्राने आघाडीवर राहावे, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केली.

पुणे येथील राजभवन परिसरात एक मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, मेडाचे महासंचालक राजाराम माने,  राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.

            राजभवनच्या इतिहासात आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. कारण हे देशातील सर्व राजभवनापैकी सर्वोच्च क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाचे आज उद्घाटन होत आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, ‘केंद्र सरकारने सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात नवनवीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय सोलर मिशनच्या अंतर्गत २०२२ पर्यंत २० हजार मेगावॅटवरून एक लाख मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. ऊर्जा टंचाईवर मात करण्याचे प्रयत्न करीत असतानाच आपण स्वच्छ, शाश्वत आणि नवीनीकरण ऊर्जा स्त्रोतांचा वापर करायला हवा. आपल्या देशातील लोकांची आणि औद्योगिकरणाची वाढती गरज भागविण्यासाठी आपल्याला सौरऊर्जेकडे वळावेच लागेल. कारण आता सौरऊर्जा हा अनिवार्य पर्याय उरला आहे, असे राज्यपाल राव यांनी सांगितले.

            आपल्या देशात सौर उर्जेची प्रचंड निर्मिती होऊ शकते. देशाच्या प्रत्येक भागात वर्षातून २५० ते ३०० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे आपली उर्जेची गरज सौरनिर्मितीतून भागवू शकतो. मात्र, सौरऊर्जा निर्मितीच्या यंत्रसामग्रीत सातत्याने संशोधन होऊन त्याचे दर कमी होण्याची आवश्यकता आहे. पारंपारिक ऊर्जा निर्मिती क्षेत्राकडून सौरऊर्जा निर्मिती क्षेत्राला स्पर्धक म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. या क्षेत्राचा विकास होण्यासाठी पूरक असे धोरण आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे आता शासनासमोरील आव्हान आहे, असे राज्यपाल विद्यासागर राव यांनी सांगितले.

 

वीजनिर्मितीबरोबर बचतीचेही धोरण-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘राज्यपाल विद्यासागर राव यांनी राजभवन सामान्य माणसाला खुले करून त्याला लोकभवनचे रूप दिले. अपारंपारिक ऊर्जाच्या वापरला चालना देण्यासाठी राज्यातील तीनही राजभवनात सौरऊर्जा प्रकल्प उभे केले आहेत. या प्रकल्पामुळे राजभवनाच्या एकूण वापराहूनही जास्त वीज निर्मिती होईल.’

राज्य शासनाने वीज निर्मिती बरोबरच वीज बचतीचेही धोरण आखले आहे. याद्वारे एक हजार मेगावॅट वीज बचत केली जाऊ शकते. एलईडी बल्बचा वापर आणि ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात आठ कोटी एलईडी बल्ब लावले आहेत. शेतीचे फिडर सौरऊर्जेवर रुपांतरीत करणार आहोत. त्यामुळे विजेपोटी द्यावी लागणाऱ्या अनुदानात बचत होईल. राळेगणसिद्धी येथे पहिल्या फिडरचे भूमिपूजन झाले आहे. उपसा सिंचन योजनाही सौरऊर्जेवर चालवण्याचा विचार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वेणुगोपाल रेड्डी यांनी प्रास्ताविक केले तर मेडाचे महासंचालक राजाराम माने यांनी आभार मानले.

यावेळी खासदार अमर साबळे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, राज्यपालांचे उपसचिव रणजित कुमार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

******