Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

04.11.2017

स्वातंत्र्य संग्राम स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावे - राज्यपाल चे. विद्यासागर राव

जिल्हा माहिती अधिकारी

औरंगाबाद- 431001

 

स्वातंत्र्य संग्राम स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावे

-         राज्यपाल चे. विद्यासागर राव

           

औरंगाबाद,दि.04 (जिमाका) – 1857 चा उठाव, 1947 चा स्वातंत्र्य लढा आणि 1948 सालच्या हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्याचे प्रतिक असणारे शहरातील स्वातंत्र्य संग्राम स्मारक हे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

            औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्य संग्राम स्मारकाचा लोकार्पण सोहळा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, खा. चंद्रकांत खैरे, खा. रावसाहेब दानवे,  जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, सुभाष झांबड, संजय शिरसाट, अतुल सावे, इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर, समिती समन्वयक रामचंद्र भोगले आणि मानसिंग पवार आदी उपस्थित होते.

            स्वातंत्र्य संग्राम स्मारकाच्या ठिकाणी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राष्ट्रध्वजास अभिवादन केले त्यानंतर राष्ट्रगतीत झाले. या नंतर त्यांनी स्मारकातील   1857, 1947 आणि 1948 सालचा इतिहास कोरलेल्या शिलालेखाची पाहणी केली.  राज्यपालांच्या हस्ते कोणशिलेचे आणावरण करण्यात आले.

            हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्याविषयी राज्यपाल म्हणाले की, भारताचे शेवटचे व्हाईस रॉय लॉर्ड माऊंट बॅटन  यांनी छोट्या छोट्या संस्थानांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव दिला होता. बहुतेक संस्थानिकांनी भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला पण हैद्राबाद संस्थानाचे निजाम उस्मान अली खान यांना निझाम संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व पाहिजे होते. तेव्हा मराठवाडा, तेलंगाना, कर्नाटक आणि हैद्राबादचा काही भाग मिळून एक संस्थान अस्तित्वात होते. निझामाच्या राजवटीला जनतेने पूर्ण विरोध केला. निझामाच्या जुलमी राजवटी विरोधात लढा उभारला गेला. हा लढा मोडीत काढण्यासाठी निझामाचा सेनापती कासिम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार केले. मात्र जनतेने पूर्ण शक्तीनीशी विरोध करायचे ठरवले. या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. तसेच गोविंद भाई श्रॉफ, भाऊसाहेब वैश्यमापायन, अनंत भालेराव, रमन भाई पारीख, दिगंबर राव बिंदू, देवी सिंग चव्हाण, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे, चंद्रगुप्त चौधरी यांच्यासह अनेक क्रांतीकारांचे योगदान यामध्ये महत्वाचे आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही मराठवाडा स्वातंत्र्य नव्हता. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले ते 17 सप्टेंबर 1947 रोजी. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई अशा सर्व जाती धर्मांतील लोकांनी आपले प्राण दिले.  लेाक हेाते. त्यामुळे 210 फूट उंचीचा राष्ट्रध्वज असलेले हे स्मारक पुढील पिढीसाठी देशभक्ती, स्वाभिमान, आत्मविश्वास आणि आत्म गौरवाचे प्रतिक कसे बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगूण राज्यपाल म्हणाले की, 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यातील जनतेसाठी खूप महत्वाचा आहे. मुक्तिसंग्रामामध्ये भाग घेणाऱ्या स्वातंत्र्‌य सैनिकांच्या गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्योचही आवाहनही राज्यपाल श्री. राव यांनी  केले.

            विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, या स्मारकाची मूळ कल्पना ही राज्यपाल महोदयांचीच आहे. जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राजभवनात ज्या जागेवर बसून महाराष्ट्र राज्याची घोषणा केली त्याच जागेवर राज्यपाल महोदयांनी स्फूर्तीस्तंभ उभा केला आहे ज्यावर आज खूप मोठा राष्ट्रध्वज फडकतोय. 1 मे 2016 रोजी त्या राष्ट्रध्वजाचे लोकार्पण झाले. तेव्हाच मराठवाड्यात असा राष्ट्रध्वज उभा करायची इच्छा राज्यपालांनी बोलून दाखवली. आणि आज हे स्मारक उभे राहिले. हे स्मारक पुढील पिढीला स्फुर्ती देणारे ठरणार असल्याचेही बागडे म्हणाले.

            स्वातंत्र्य संग्रम समितीचे अध्यक्ष डॉ. पुरूषोत्तम भापकर स्वागतपर भाषणात म्हणाले की, औरंगाबाद शहर हे ऐतिहासिक आणि पर्यटन शहर म्हणून परिचित आहे. या ठिकाणी या संस्मरणीय राष्ट्रध्वजाची उभारणी झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्याची अजिंठा- वेरुळच्या लेण्या , देवगिरीचा किल्ला, बिबी का मकबरा, पैठणी साडी,  हिमरू शाल  यांना जागतिक  ओळख आहे. यामध्ये आता या स्मारकाची भर पडली आहे.

            समितीचे समन्वयक राम भोगले म्हणाले की, आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहिला जावा असा  आहे. क्रांती चौकातील जागेला स्मारकाची पार्श्वभूमी असल्याने ही जागा निवडण्यात आली. लोकांना हे स्मारक आपले वाटावे म्हणून लोकसहभागातून उभारण्यात आले आहे. लोकसहभागातून उभारलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून सामान्यांना माहिती नसलेला इतिहास या माध्यमातून समोर येईल अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.


0000000