Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

09.10.2017

शासकीय कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाने तयार केलेल्या वस्तुंचा वापर करावा - राज्यपाल


महान्यूज

वृ.वि. 6905                                                                     16 अश्विन, 1939 (दु.2.50)

दि. 09 ऑक्टोबर, 2017

महाखादी प्रोत्साहन यात्रेचा शुभारंभ

शासकीय कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाने तयार केलेल्या वस्तुंचा वापर करावा

- राज्यपाल

मुंबई, दि. 9 : खादीचा वापर वाढण्याच्या दृष्टीने विविध शासकीय कार्यक्रमात पुष्पगुच्छ देण्याऐवजी खादी ग्रामोद्योग मंडळाने तयार केलेल्या वस्तुंचा वापर करावा, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.

राजभवनात आज आयोजित महाखादी प्रोत्साहन यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. राज्यपाल श्री. राव पुढे म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशभर खादीचा प्रचार केला. स्वातंत्र्य लढ्यात खादीने मोलाची मदत केली. खादी एक कपडा नसून एक विचार आहे, हा त्यांचा संदेश घराघरात पोहोचला पाहिजे. खादीबद्दल जगभराच्या लोकांमध्ये उत्सुकता आहे. परदेशी नागरिक भारतात येतात तेव्हा आवर्जून खादीचे कपडे खरेदी करतात. आपल्याकडे विदेशातील मान्यवर प्रतिनिधी जेव्हा येतात, त्यांना खादी बरोबरच खादी ग्रामोद्योग मंडळाने तयार केलेल्या वस्तु भेट म्हणून दिल्या पाहिजेत. आधुनिक पद्धतीने डिझाईन केलेल्या वस्तू, कपडे याचे मार्केटिंग केले पाहिजे. तरच खादीचा महाब्रँड जगभर पोहोचेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे खादीचा प्रचारासाठी मोठे योगदान आहे. ग्रामीण कारागीर, महिलांना मोठ्या प्रमाणात खादीने रोजगार मिळवून दिला आहे. खादीचा वापर प्राधान्याने करा, या प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रत्येकाने प्रतिसाद दिला पाहिजे. खादीमध्ये मोठी शक्ती असून ती माणसांना जोडण्याचे काम करेल.

महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यात जाणाऱ्या या खादी यात्रेमुळे जनतेमध्ये खादीचे महत्व वाढेल. मध आणि अन्य वस्तुंची विक्री होईल. लोकांना शासनाच्या योजना समजून घेता येतील. त्याचबरोबर या यात्रेचे रुपांतर मोठ्या लोकचळवळीत होईल, असेही शेवटी त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील म्हणाले, या खादी यात्रेमुळे खादीचा मोठ्या प्रमाणात प्रचार होईल. ग्रामीण कारागीरांना फायदा होऊन ग्राम उद्योगांना प्रोत्साहन मिळेल. खादीचा ब्रँड घराघरात पोहोचायला मदत होईल.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले, ग्रामीण भागातील कारगिरांना सहभागी करुन त्यांना रोजगार मिळवून देणे, खादीचा प्रसार करणे हा उद्देश या खादी यात्रेचा आहे. महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्याच्या सहकार्याने नारळ आणि अन्य उत्पादनापासून रोजगार मिळण्यासाठी अनेक छोटे उद्योग कोकणात सुरु करीत आहोत. खादीचे कापड आणि अन्य वस्तू मॉल आणि अन्य कार्पोरेट क्षेत्रात विक्रीकरिता प्रयत्न सुरु आहेत. यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या खादी यात्रेला शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे चेअरमन विशाल चोरडिया यांनी प्रास्ताविक केले. राज्यपाल श्री. राव यांनी खादी व ग्रामोद्योग मंडळाने तयार केलेल्या वस्तुंची पाहणी केली. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून राज्यस्तरीय खादी यात्रेचा शुभारंभ केला.

ही खादी महायात्रा राज्यातील 20 जिल्ह्यात पोहोचणार असून 20 डिसेंबर रोजी नागपूर येथे समारोप होईल. प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस ही यात्रा थांबणार असून तेथे खादी महोत्सव होईल. या महोत्सवात शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, सरकारी कर्मचारी, अधिकारी, लोक प्रतिनिधी, नागरिक भेट देतील. जिल्ह्याचे पालकमंत्री तेथे उपस्थित राहणार आहेत.

००००