Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

29.07.2017

‘मन की बात’ द्वारे प्रधानमंत्र्यांनी लोकांच्या कल्पनांना आकार दिला - राज्यपाल चे. विद्यासागर राव


महान्यूज

मुंबई, दि. 29 : स्वातंत्र्य सैनिकांनी रेडिओच्या माध्यमाचा वापर जनतेपर्यंत विचार पोहोचविण्यासाठी केला होता. आज दूरचित्रवाणी क्रांतीप्रमाणेच प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बदल झाले आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांशी संवाद साधण्यासाठी रेडिओसारखे माध्यम वापरुन 'मन की बात' द्वारे शिक्षण, पर्यावरण संरक्षण, स्वच्छ भारत, बेटी बचाओ अभियान, महिला सक्षमीकरण आदी अनेक क्षेत्रात लोकांच्याच कल्पनांना आकार देत लोकसहभागाचा अद्वितीय संवाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला आहे, असे मत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.
             राजभवनात ब्ल्यू क्राफ्ट डिजीटल फाऊंडेशन द्वारे 'मन की बात - ए सोशल रिव्होल्यूशन ऑन रेडिओ' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पीयूष गोयल,  आमदार आशिष शेलार, ब्ल्यूक्राफ्ट डिजिटल फाऊंडेशनचे संस्थापक संचालक हितेश जैन आदी उपस्थित होते.
            मोदींच्या काही क्रांतिकारी कल्पनांनी लोकांच्या मनात, विशेषतः मुले आणि युवकांच्या मनावर सामाजिक कार्य करण्यासाठी खोल परिणाम केला आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, 'मन की बात' च्या माध्यमातून मोदींनी लावलेले क्रांतिचे बीज येत्या कालावधीत फळ देईल. यासाठी केंद्र व राज्य सरकारे, स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे आणि कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्त्व (सीएसआर) यांना समाजहिताच्या कामात गुंतवावे लागेल आणि बांधिलकीने काम करावे लागेल.
            ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्र्यांच्या 'मेक इन इंडिया', 'डिजिटल भारत', 'स्वच्छ भारत अभियान', 'नमामी गंगे' आणि इतर अनेक कार्यक्रमांना जगाने गौरविले आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात प्रधानमंत्री जगामध्ये केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्या प्रयत्नाने 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संयुक्त राष्ट्राने मान्यता दिली. ‘व्हीआयपी' संस्कृतीचा अंत करण्याचा आणि देशभरातील भ्रष्टाचार आणि काळा पैसा नष्ट करण्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांना प्रत्येक भारतीयाचा पाठिंबा मिळाला आहे.
            यावेळी राज्यपालांनी राजभवनची इमारत दिव्यांग-सुलभ बनविण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यानुसार राजभवनमधील इमारतींमध्ये दिव्यांगांना प्रवेश करता यावा यासाठी रॅम्प बनविण्यात येणार आहे.
             प्रधानमंत्री श्री. मोदी हे समाजाला प्रेरित करू शकतात ही त्यांना मोठी देणगी आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, समाजात चांगले काम करण्याची इच्छा असलेले अनेक लोक आहेत; मात्र त्यांना प्रेरणा देण्याची गरज आहे. प्रधानमंत्र्यांनी 'मन की बात' द्वारे लाखो लोकांना प्रेरित करण्याचे काम केले. 'मन की बात' हे केवळ प्रधानमंत्र्यांच्या मनातील विचार नसून सर्वसामान्यांच्या मनातील विचार आहेत. 'मन की बात' पूर्ण भारताला संमोहित करतेच; मात्र आगामी काळात संवाद मुत्सद्दी असणाऱ्या व्यक्तींनाही आपली संवादाची दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शन करणारी आहे.
            ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्र्यांच्या ‘मन की बात’च्या प्रत्येक भागावर अभ्यास केल्यास मोठे कार्य होऊ शकते. त्यांनी प्रत्येक भागात वेगवेगळ्या विषयांना हात घातला. एका भागात त्यांनी जलसंधारणाच्या वर विचार मांडले. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील जलसंधारण कामाचा उल्लेख केला. त्यामुळे आपलाही अभिमान जागृत झाला. प्रधानमंत्री यांच्या प्रत्येक रणनितीवर 'मन की बात' चा एक भाग होऊ शकतो. एक व्यक्ती कशा प्रकारे परिवर्तन करू शकते याचे हे उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
            ब्ल्यूक्राफ्ट डिजीटल फाऊंडेशनद्वारे ‘मन की बात’ च्या भागांचे पुस्तक प्रसिद्ध केल्याने सर्वांपर्यंत श्री. मोदी यांचे विचार लिखीत स्वरुपात पोहोचतील. त्याचा उपयोग विद्यार्थी, विविध विषयातील तज्ज्ञ तसेच सर्वसामान्यांनाही होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
            श्री. गोयल यावेळी म्हणाले की, ‘मन की बात’ द्वारे मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य बाबींना नवीन आयाम देण्याचे काम केले. ‘मन की बात’ चे प्रत्येक भाग लोकसहभागाशी संलग्न आहेत. लोकांना एकत्र आणण्याचे काम त्यांच्या विविध भाषणांनी केले. संवादाची एक नवीन पद्धती तयार करण्याचे काम त्यांनी केले, असेही श्री. गोयल म्हणाले.
            यावेळी श्री. जैन यांनी प्रास्तविक केले. ब्ल्यू क्राफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अखिलेश मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले.
०००

सचिन गाढवे/डीएलओ/29-7-2017