Skip Navigation Links

विद्यापीठ कायद्यांतर्गत कुलपतींच्या जबाबदा-या आणि कर्तव्ये [परत जा]छापाprint

त्या त्यावेळी असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल हे प्रत्येक विद्यापीठाचे कुलपती असतील व त्यांच्या पदपरत्त्वे ते विद्यापीठाचे प्रमुख असतील: कलम 9 (1)

कुलपती उपस्थित असेल तेव्हा, विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षपद स्वीकारतील. कुलपतीच्या अनुपस्थितीत, कुलगुरूस विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षपद स्वीकारता येईल आणि कुलपती, कुलगुरूस कोणत्याही विशिष्ट प्रयोजनाकरिता आवश्यक असेल तेंव्हा, विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाची सभा बोलावण्याचा निदेश देऊ शकेल व कुलगुरू, अशा सभेचे कार्यवृत्त कुलपतीस त्यांच्या अवलोकनार्थ सादर करील: कलम 9 (2)

कुलपती, कलम 8 च्या पोट-कलम (4) च्या परंतुकान्वये राज्य शासनाकडून, अशा बाबींमधील संदर्भ मिळाल्यावर, किंवा कोणत्याही बाबींमध्ये, स्वाधिकारे किंवा अन्य प्रकारे, विद्यापीठांच्या अशा बाबींच्या संबंधात अहवाल किंवा स्पष्टीकरण किंवा अशी माहिती व अभिलेख देण्यास फर्मावील, आणि असा अहवाल / स्पष्टीकरण/माहिती किंवा अभिलेख यावर विचार केल्यानंतर, विद्यापीठाच्या किंवा विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने किंवा एकंदर जनतेच्या हिताच्या दृष्टीने, त्यांना योग्य वाटतील असे निदेश देतील: कलम 9 (3) (क) आणि (ख)

कुलपतीस, कुलगुरुंकडून लेखी अहवाल घेतल्यानंतर, कोणत्याही प्राधिकरणाचा, मंडळाचा, समितीचा किंवा अधिकाऱ्यांचा कोणताही ठराव, आदेश किंवा कामकाज त्यांच्या मते या अधिनियमांशी किंवा त्याखाली केलेल्या परिनियमांशी किंवा आदेशांशी किंवा विनिमयांशी सुसंगत नसेल किंवा विद्यापीठाच्या हिताचे नसेल तर, ते स्थगित करता येईल, किंवा त्यात फेरबदल करता येईल आणि विद्यापीठाचे प्राधिकरण, मंडळ, समिती व अधिकारी त्याचे पालन करतील : कलम 9 (4).

ज्या बाबतीत कुलपतीच्या मते, निवडून दिलेल्या/नामनिर्देशित केलेल्या/नियुक्त केलेल्या/स्वीकृत केलेल्या कोणत्याही सदस्याचे वर्तन विद्यापीठाचे किंवा कोणत्याही प्राधिकरणाचे किंवा मंडळाचे किंवा समितीचे कामकाज सुरळीत चालण्यास बाधक ठरत असेल तर, अशा सदस्यास, त्याचे लेखी स्पष्टीकरण देण्याची संधी दिल्यानंतर व अशा प्रकारचे कोणतेही स्पष्टीकरण मिळाल्यास, त्यावर विचार करून आणि असे करणे आवश्यक आहे याबद्दल स्वत:ची खात्री करून घेतल्यानंतर अशा सदस्यास, त्याला योग्य वाटेल तेवढ्या कालावधीकरिता अपात्र ठरविता येईल किंवा त्याला निलंबित करता येईल : कलम 9(5).

कुलपती, शोध समितीच्या शिफारशीवरून कुलगुरूंची नियुक्ती करतील : कलम 12 (1)

कुलपती, एक वर्षाहून अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी स्थानापन्न कुलगुरूंची नियुक्ती करतील: कलम 12 (7).

रजा, आजार यामुळे किंवा अन्य कारणांमुळे कुलपतीचे पद तात्पुरते रिक्त झाले असेल अशा बाबतीत कुलपती, रीतसर कुलगुरू कामावर रूजू होईपर्यंत कोणत्याही योग्य व्यक्तीची कुलगुरू म्हणून काम करण्यासाठी नियुक्ती करील : कलम 12 (7) (ग).

मृत्यू, राजीनामा यामुळे किंवा अन्य कारणांमुळे कुलगुरूंचे पद रिक्त झाले असेल अशा बाबतीत आणि कुलगुरूंचा पदावधी समाप्त होत असेल त्यावेळी कुलपती, कुलगुरूंची रीतसर नियुक्ती करेपर्यंत परंतु एका वर्षाहून अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी हंगामी कुलगुरू म्हणून कोणत्याही योग्य व्यक्तीची नियुक्ती करतील : कलम 12 (7) (क) (ख) (ग) (घ) (ङ)

कुलगुरूला त्याच्या पदावरून काढून टाकण्याचे अधिकार कुलपतींना असतील : कलम 12 (13).

कुलपती, कुलगुरूंशी विचारविनिमय करून प्रति कुलगुरूंची नियुक्ती करतील : कलम 13(1).

कुलगुरूंच्या मते विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाने किंवा मंडळाने किंवा समितीने घेतलेला निर्णय किंवा संमत केलेला ठराव हा, अधिनियमांच्या, परिनियमांच्या, आदेशाच्या तरतुदीशी सुसंगत नाही किंवा विद्यापीठांच्या हिताचा नाही आणि तो ही बाब कुलपतीकडे पाठवेल तेंव्हा कुलपती या बाबीवर निर्णय घेतील आणि कुलगुरूला योग्य ते निदेश देतील : कलम 14 (6)

कुलपती, अधिसभेवर दहा व्यक्ती नामनिर्देशित करतील : कलम 25 (2) (ध), (न) व (भ).

कुलपती अधिसभेच्या बैठकींचा अध्यक्ष असतील : कलम 25 (3).

कुलपती कुलगुरूने शिफारस केल्याप्रमाणे अधिसभेच्या बैठकीच्या दिनांकास/दिनांकांना मान्यता देतील: कलम 25(4).

कुलपती व्यवस्थापन परिषदेवर एक व्यक्ती नामनिर्देशित करतील : कलम 27 (1) (घ) .

कुलपती विद्यापरिषदेवर उच्च शिक्षण क्षेत्रातील दोन मान्यवर तज्ञ व्यक्ती नामनिर्देशित करतील:कलम 29 (2) (ट).

विद्यापीठाने तयार केलेल्या परिनियमांना कुलपती अनुमती देतील : कलम 52 (4).

कुलपतीस, स्वत: होऊन किंवा राज्य शासनाच्या सल्ल्यानुसार ते विनिर्दिष्ट करतील अशा कोणत्याही बाबीसंबंधात परिनियम करण्याविषयी विद्यापीठाला निदेश देता येतील आणि अधिसभेने असे निदेश प्राप्त झाल्यापासून साठ दिवसांच्या आत, त्यांची अंमलबजावणी केली नाही तर, अधिसभेने अशा निदेशांची अंमलबजावणी करणे तिला शक्य न झाल्याबद्दलची कोणतीही कारणे कळविली असतील तर, त्या कारणांचा विचार केल्यानंतर, कुलपतींना योग्य असे परिनियम करता येतील किंवा त्या परिनियमात योग्य अशा सुधारणा करता येतील : कलम 52 (6).

विद्यापीठाने तयार केलेल्या आदेशांना कुलपती मान्यता देतील: कलम 54 (4).

कुलपती, राज्य उच्च शिक्षण परिषदेवर चार शिक्षण प्रशासक नामनिर्देशित करतील : कलम 56(2) (6).

कुलपती, प्राचार्यांमधून एक प्राचार्य राज्य उच्च शिक्षण परिषदेवर नामनिर्देशित करतील: कलम 56(2) (7).

कुलपती, शिक्षकांमधून एक शिक्षक राज्य उच्च शिक्षण परिषदेवर नामनिर्देशित करतील : कलम 56 (2) (8).

कुलपती, राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंमधून तीन कुलगुरू राज्य उच्च शिक्षण परिषदेवर नामनिर्देशित करतील : कलम 56 (2) (9).

कुलपती, विद्यापीठातील विद्यापीठीय परीक्षांचा निकाल जाहिर करण्यात विलंब झाल्याबाबतची कारणे मागवतील : कलम 72 .

कुलपती, विद्यापीठ अध्यापकांची नेमणूक करण्यासाठी शिफारस करण्याकरिता असलेल्या निवड समितीवर एका व्यक्तीला नामनिर्देशित करतील : कलम 76 (2) (ख).

कुलपती, विद्यापीठ अध्यापकांची नेमणूक करण्यासाठी शिफारस करण्याकरिता असलेल्या निवड समितीवर अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / निरधिसूचित जमाती आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमाती किंवा इतर मागासवर्गातील एका व्यक्तीला नामनिर्देशित करतील : कलम 76 (2) (च)

प्रत्यक्ष प्रतिकुल परिणाम झालेल्या कोणत्याही व्यक्तीच्या विनंती अर्जावर किंवा स्वाधिकारे कुलपती, चौकशी केल्यानंतर आणि ज्या अध्यापकांच्या नियुक्तीवर परिणाम होण्याची शक्यता असेल अशा आध्यापकांच्या स्पष्टीकरणासह, स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर कुलपतींची कोणत्याही वेळी अशी खात्री पटली की, विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाने केलेली विद्यापीठाच्या अध्यापकाची नियुक्ती त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्यानुसार नव्हती, तर कुलपती आदेशाद्वारे त्या अध्यापकाला एक महिन्याची नोटीस देऊन किंवा अशा नोटीशीच्या ऐवजी एक महिन्याचे वेतन देऊन त्याची नियुक्ती समाप्त करण्याचा निदेश कुलगुरूंना देऊ शकेल : कलम 76 (7)

कलम 76 (7) अन्वये कुलपतीने काढलेला कोणताही आदेश अंतिम असेल : कलम 76 (8)

कुलपती, संचालित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची नियुक्ती इत्यादींसाठीच्या निवड समितीवर एक सदस्य नामनिर्देशित करतील : कलम 76 (ख)

नैतिक अध:पाताचा अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही अपराधाबद्दल न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला दोषी ठरविले असेल तर, व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषद यांनी केलेल्या शिफारशीवरून कुलपतींना, त्या व्यक्तीची, पदवी/पदविका/प्रमाणपत्र किंवा विद्याविषयक अन्य कोणतीही विशेषोपाधी काढून घेण्याचे अधिकार असतील : कलम 96 (2).

सन्मान्य पदवी देण्यासाठीचे प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेसमोर तिच्या विचारार्थ ठेवण्यापूर्वी कुलपती या प्रस्तावांना मान्यता देतील : कलम 97 (1) (2).

नैतिक अध:पाताचा अंतर्भाव असलेल्या अपराधाबाबत न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरविले असेल तर, व्यवस्थापन परिषद व अधिसभा यांच्या शिफारशीवरून त्या व्यक्तीचे नाव पदवीधर नोंदवहीतून काढून टाकण्याचा अधिकार कुलपतींना असेल : कलम 100 (1).

कुलगुरूने किंवा प्रत्यक्ष प्रतिकूल परिणाम झालेल्या व्यक्तीने दिलेल्या संदर्भावरून, कुलपतींना, अधिनियमांच्या, परिनियमांच्या, आदेशाच्या, विनियमाच्या किंवा नियमांच्या तरतुदींची अर्थउकल करण्याचे आणि विनंती अर्जावर निर्णय देण्याचे अधिकार असतील : कलम 108

याशिवाय, कुलपती, विद्यापीठाची कायदेशीर सल्लागार समिती आणि इमारती व बांधकाम समिती यांसारख्या असंविधानिक मंडळांवर तीन व्यक्तींचे नामनिर्देशनदेखील करतील.

महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम (कृषि विद्यापीठे) 1983:-

 

विद्यापीठाच्या कामकाजाच्या कोणत्याही मुद्यांवर तपासणी व चौकशी करण्याचा अधिकार कुलपतीला असेल : कलम 11 (1).

विद्यापीठाचे कामकाज हे विद्यापीठांच्या उद्देशांच्या पृष्ट्यार्थ किंवा अधिनियम, परिनियम आणि विनियम यांच्या तरतुदींनुसार चालविण्यात येत नसेल तर, कुलपतींना निदेश देण्याचे अधिकार असतील : कलम 11 (6).

विद्यापीठाचे प्रशासन व अर्थव्यवस्था यासंबंधित माहिती वेळोवेळी मिळवण्याचे अधिकार कुलपतींना असतील : कलम 11 (7).

कुलपती महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेवर एक व्यक्ती नामनिर्देशित करतील : कलम 12 (2) (पाच).

कुलपती हे विद्यापीठाचे प्रमुख असतील आणि उपस्थित असतील तेव्हा ते विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षपद स्वीकारतील : कलम 15 (1)व (2).

कुलपतींना, आपल्या माहितीसाठी म्हणून विद्यापीठाच्या कामकाजासंबंधीचे कोणतेही कागदपत्र मागवता येतील : कलम 15 (3).

कुलपती, सन्मान्य पदवी प्रदान करण्याच्या प्रस्तावास मान्यता देतील : कलम 15 (4).

कुलपतींना विद्यापीठाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे किंवा प्राधिकरणाचे कोणतेही कामकाज, अधिनियम, परिनियम किंवा विनियम यास अनुसरून नसेल तर विलोपित करण्याचा अधिकार असेल: कलम 15 (5).

कुलपती, निवड समितीने शिफारस केलेल्या नामिकेमधून कुलगुरूची नियुक्ती करतील: कलम 17(1).

अपवादात्मक परिस्थितीत, कुलपती सहा महिन्यांहून अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी कुलगुरुचा पदावधी वाढवू शकतो : कलम 17(4).

कुलगुरूने कर्तव्य पालनामध्ये हयगय केल्यास किंवा प्रतिकुलपतीकडून देण्यात आलेल्या निदेशांचे अनुपालन करण्यात कसूर केल्यास प्रतिकुलपतीने केलेल्या शिफारशीवरून, कुलगुरूला पदावरून काढून टाकण्याचा अधिकार कुलपतीला असेल: कलम 17(6) (अ).

कुलपतीच्या मते कुलगुरू पदावर चालू राहणे हे विद्यापीठाच्या हितसंबंधास बाधक ठरत असेल तर कुलपतीस, कुलगुरूला कोणत्याही वेळी पदावरून दूर करण्याचा अधिकार असेल: कलम 17(6)(ब).

आपल्या आकस्मिक अधिकारान्वये कुलगुरूने केलेल्या कार्यवाहीवरील कार्यकारी परिषदेच्या अपिलीय आदेशामुळे पीडित झालेल्या व्यक्तीने दाखल केलेल्या अपिलावर कुलपती निर्णय देईल:कलम 18(18)

कुलपती, कार्यकारी परिषदेवर एक नामवंत कृषि वैज्ञानिक नामनिर्दिष्ट करील: कलम 30(एक)(आठ)

कुलपतीस विद्यापीठाने तयार केलेल्या कोणत्याही परिनियमास आपली संमती देता येईल किंवा संमती रोखून ठेवता येईल किंवा फेरविचारासाठी पाठवता येईल: कलम 38 (4)

कोणत्याही विद्यमान परिनियमात सुधारणा करणे किंवा नवीन परिनियम करणे आवश्यक आहे असे राज्य शासनाचे मत होईल तर, राज्य शासनाला कुलपतीच्या सहमतीने अशा परिनियमात सुधारणा करता येईल किंवा नवीन परिनियम करता येईल: कलम 38 (6).

कुलपतीस, लवाद न्यायाधिकरणावर पंच म्हणून एक व्यक्ती नामनिर्देशित करता येईल: कलम 57 (3)

कुलपतीस, विद्याविषयक वरिष्ठ कर्मचारी वर्गाच्या निवडीसाठी निवड समितीवर दोन तज्ञ व्यक्ती नामनिर्देशित करता येतील: कलम 58 (2) (चार).

कुलगुरूने दिलेल्या संदर्भावरून कुलपतीस अधिनियमाच्या, परिनियमाच्या आणि विनियमाच्या तरतुदींची अर्थउकल करण्याचा आणि निवडीबाबतच्या विनंतीअर्जांवर निर्णय देण्याचा अधिकार असेल: कलम 64

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, 1989

 

कुलपतीस विद्यापीठाचे प्रशासन आणि कामकाजाशी संबंधित कोणतेही कागदपत्र/अहवाल आपल्या माहितीकरिता मागवता येईल: कलम 8 (1) (2).

कुलपतीस, विद्यापीठाचे प्रशासन व अर्थव्यवस्था यांच्याशी संबंधित कोणत्याही बाबीविषयी तपासणी आणि चौकशी करण्याचा अधिकार असेल: कलम 8 (3).

कुलपतीस, अधिनियम, परिनियम किंवा आदेश यांच्याशी सुसंगत नसणारा विद्यापीठाचा कोणताही निर्णय, आदेश किंवा कार्यवाही विलोपित करण्याचा, निलंबित ठेवण्याचा किंवा तीमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार असेल:कलम 8 (10)

कुलगुरूने आपल्या आकस्मिक अधिकारान्वये केलेल्या कार्यवाही संदर्भात, कुलगुरू आणि विद्यापीठाचा कोणताही प्राधिकारी किंवा मंडळ त्यांच्या दरम्यान कोणताही मतभेद उदभवल्यास, कुलपती या बाबीवर निर्णय देईल: कलम 10 (4)

विद्यापीठाने तयार केलेल्या परिनियमांना कुलपती संमती देईल: कलम 22 (3)

कोणतेही परिनियम कुलपतीने अनुमती दिल्याखेरीज विधिग्राह्य होणार नाही:कलम 22 (4)

कुलपती, अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतनंतरच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये, नवीन किंवा आणखी परिनियम करू शकेल किंवा अधिनियमाच्या दुसऱ्या अनुसूचीत देण्यात आलेल्या परिनियमांमध्ये सुधारणा करू शकेल किंवा ते निरसित करू शकेल : कलम 22 (5)

कुलपती, विद्यापीठाने तयार केलेल्या आदेशांना मान्यता देईल:कलम 23 (2)

कुलपतीस, लवाद न्यायाधिकरणावर एका पंचाची नियुक्ती करता येईल: कलम 31 (1)

कुलपतीस निवडीबाबतच्या विनंती अर्जावर निर्णय देण्याचा अधिकार असेल: कलम 33 (1)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियमात नमूद केलेले कुलपतींचे अधिकार व कर्तव्ये याबरोबरच कुलपतीचे पुढील अधिकार व कर्तव्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने तयार केलेल्या परिनियमात विहित करण्यात आली आहेत.

कुलपती, निवड समितीच्या शिफारशीवरून कुलगुरूंची नियुक्ती करील : कलम 1 (2)

कुलपती, एका वर्षाहून अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी कुलगुरूंची स्थानापन्न नियुक्ती करील (अधिनियमाच्या दुसऱ्या सूचीतील परिनियम 1 (4))

कुलपती, व्यवस्थापन मंडळावर दोन कुलगुरूंचे नामनिर्देशन करील: एक कृषितर विद्यापीठांतील व दुसरा कृषि विद्यापीठातील आणि पुढील क्षेत्रातील पाच नामवंत व्यक्ती: 1. शिक्षण 2.संशोधन 3.उद्योग 4.व्यवस्थापन व वाणिज्य आणि 5.कृषि व कृषि उद्योग, व्यवस्थापन मंडळ, हे विद्यापीठाचे मुख्य कार्यकारी प्राधिकरण असेल: परिनियम 6 (1) (ज) व (झ)

कुलपती, विद्यापीठाच्या नियोजन मंडळावर दोन व्यक्तींचे नामनिर्देशन करील: परिनियम 6 (5)

कुलपती, विद्यापीठाच्या अध्यापकांची निवड करण्यासाठी निवड समितीवर आपला नामनिर्देशिती म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती करील: परिनियम 11 (1) (2) (ग)

कुलपती, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी यांची निवड करण्यासाठी निवड समितीवर आपला नामनिर्देशिती म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती करील : परिनियम 14 (1) (तीन)

कुलपती, विद्यापीठाचे कोणतेही प्राधिकरण किंवा अधिकारी किंवा इतर कर्मचारी यांच्याकडून हा अधिनियम, परिनियम, आदेश आणि विनियम यांच्या तरतुदींशी अनुरूप नसेल अशी कोणतीही कृती घडल्याने विद्यापीठाची हानी झाली असेल अशा बाबींसंबंधात चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करण्याकरिता विद्यापीठ व्यवस्थापन मंडळाला निदेश देण्याचे अधिकार असतील : परिनियम 21 (1) व (2)

कुलपतीस, एकतर व्यवस्थापन मंडळ किंवा त्याचा कोणताही सदस्य किंवा कुलगुरू यांच्यामुळे विद्यापीठास झालेल्या हानीबाबत किंवा नुकसानीबाबत चौकशी करण्यासाठी एक किंवा अनेक व्यक्तींनी मिळून बनलेली चौकशी समिती नेमण्याचे अधिकार असतील: परिनियम 21 (7)(अ)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, 1989

 

कुलपती हा विद्यापीठाचा प्रमुख असेल आणि तो उपस्थित असेल तेव्हा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षपद स्वीकारील: कलम 10 (1)

कुलपती हा विद्यापीठाच्या प्रशासनाशी व कामकाजाशी संबंधित असे कोणतेही कागदपत्र स्वत:च्या माहितीसाठी मागवू शकेल व अशा मागणीचे विद्यापीठाकडून अनुपालन करण्यात येईल: कलम 10 (2)

सन्माननीय पदव्या देण्यासंबंधीच्या प्रस्तावाला कुलपती मान्यता देईल: कलम 10 (3)

कुलपतीस, अधिनियमाशी, परिनियमाशी आणि विनियमाशी सुसंगत नसेल अशा विद्यापीठाचा कोणताही अधिकारी किंवा प्राधिकरण यांची कोणतीही कार्यवाही विलोपित करण्याचा, निलंबित ठेवण्याचा किंवा त्यात सुधारणा करण्याचा अधिकार असेल: कलम 10 (4)

विद्यापीठाचे कामकाज हे विद्यापीठाच्या उद्देशांच्या पुष्ट्यर्थ किंवा अधिनियम व परिनियम, आदेश किंवा विनियम यांच्या तरतुदींनुसार चालवण्यात येत नसेल तर, कुलपतीला विद्यापीठाला निदेश देण्याचा अधिकार असेल: कलम 11 (6)

कुलपती, निवड समितीच्या शिफारशीवरून कुलगुरूंची नियुक्ती करील: कलम 12 (2)

कुलपती, सहा महिन्यांहून अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी कुलगुरूंची स्थानापन्न नियुक्ती करील: कलम 12 (8)

कुलपतीस, कार्यकारी परिषदेच्या अपील आदेशामुळे आपल्यावर अन्याय झालेला आहे असे समजणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने त्यांच्याकडे केलेल्या अपिलावर निर्णय देण्याचा अधिकार असेल. असे अपील, असा आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत कुलपतीकडे केले पाहिजे: कलम 13 (16)

कुलपती, तीन वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारी परिषदेवर एक व्यक्ती नामनिर्देशित करील: कलम 23 (1) (2)

विद्यापीठाने तयार केलेल्या परिनियमांना कुलपती संमती देईल: कलम 34 (4)

विद्यापीठाने तयार केलेल्या, आदेशाना कुलपती मान्यता देईल किंवा त्यांनी मंजूर केलेल्या आदेशांना स्थगिती देईल:कलम 36 (5)

कुलपती, सन्मान्य पदवी प्रदान करण्याचे प्रस्ताव कार्यकारी परिषदेच्या विचारार्थ तिच्यासमोर ठेवण्यापूर्वी त्यास मान्यता देईल: कलम 48

कुलपतीस, कार्यकारी परिषदेच्या आणि अधिसभेच्या शिफारशीवरून नैतिक अध:पाताचा ज्यात अंतर्भाव होतो अशा कोणत्याही अपराधासाठी न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवले असेल, अशा कोणत्याही व्यक्तीचे नाव स्नातकांच्या नोंदवहीतून काढून टाकता येईल: कलम 49 (1)

कुलपती, मागावर्गीयांच्या प्रतिनिधित्वासह विद्यापीठाच्या अध्यापकांच्या निवडीसंबंधात निवड समितीवर दोन व्यक्तींचे नामनिर्देशन करील: कलम 50 (2) (ख) (दोन) आणि (सहा)

कुलपती, निवड समितीने लावलेल्या गुणवत्तेनुसार असेल त्या व्यतिरिक्त अन्यथा अध्यापक म्हणून, एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी, कार्यकारी परिषदेच्या शिफारशींना मान्यता देईल: कलम 50 (4) (ई)

जर अध्यापकाची नियुक्ती ही कायद्यानुसार नसेल तर, त्याची नियुक्त रद्द करण्याबाबत कुलगुरूला निदेश देण्याचे अधिकार कुलपतीस असतील:कलम 50 (5)

कुलगुरूने दिलेल्या संदर्भावरून, कुलपतीस अधिनियम, परिनियम, आदेश, विनियम याच्या कोणत्याही तरतुदींच्या अर्थउकलीचा आणि निवडी संदर्भातील विनंतीअर्जांवर निर्णय देण्याचा अधिकार असेल: कलम 63

कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्व-विद्यालय (विद्यापीठ) अधिनियम, 1997

 

त्या त्या वेळी असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलाधिपती (कुलपती) असतील आणि त्यांच्या पदपरत्वे ते विद्यापीठाचे प्रमुख असतील:कलम 9 (1)

कुलाधिपती उपस्थित असेल तेव्हा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षपद स्वीकारेल: कलम 9(2)

कुलाधिपतीस, विद्यापीठाच्या कोणत्याही कारभाराशी संबंधित अशी माहिती आणि अभिलेख मागविता येईल आणि त्यानंतर विद्यापीठाच्या हिताच्या दृष्टीने त्यांना योग्य वाटतील असे निदेश देता येतील: कलम 9 (3)

कुलाधिपतीस, कुलगुरूंकडून लेखी अहवाल घेतल्यानंतर कोणत्याही प्राधिकरणाचा, मंडळाचा, समितीचा किंवा अधिकाऱ्याचा कोणताही ठराव, आदेश किंवा कामकाज त्यांच्या मते या अधिनियमाशी, त्याखाली केलेल्या परिनियमांशी, आदेशांशी किंवा विनियमांशी सुसंगत नसेल किंवा विद्यापीठाच्या हिताचा नसेल तो ठराव, आदेश किंवा कामकाज स्थगित करता येईल किंवा त्यात फेरफार करता येईल आणि विद्यापीठ प्राधिकरण, मंडळ, समिती व अधिकारी त्याचे पालन करतील: कलम 9 (4)

ज्या बाबतीत कुलाधिपतीच्या मते, निवडून दिलेल्या / नामनिर्देशित केलेल्या/नियुक्त केलेल्या/स्वीकृत केलेल्या कोणत्याही सदस्याचे वर्तन, विद्यापीठाचे किंवा कोणत्याही प्राधिकरणाचे, मंडळाचे किंवा समितीचे कामकाज सुरळीत चालण्यास बाधक ठरत असेल तर, त्याला अशा सदस्यास त्याचे लेखी स्पष्टीकरण देण्याची संधी दिल्यानंतर व अशा प्रकारचे कोणतेही स्पष्टीकरण मिळाल्यास त्यावर विचार करून आणि असे करणे आवश्यक आहे याबद्दल स्वत:ची खात्री करून घेतल्यानंतर अशा सदस्यास त्याला योग्य वाटेल तेवढ्या कालावधीकरिता अपात्र ठरविता येईल किंवा त्याला निलंबित करता येईल: कलम 9 (5)

कुलाधिपती, निवड समितीच्या शिफारशीवरून कुलगुरूची नियुक्ती करील: कलम 12 (1)

कुलाधिपती, सहा महिन्यांपेक्षा अधिक नसेल इतक्या कालावधीकरिता कुलगुरूची स्थानापन्न नियुक्ती करील: कलम 12 (7)

कुलाधिपती, कुलगुरूशी विचारविनिमय करून सम-कुलगुरूची नियुक्ती करील: कलम 13 (1)

विद्यापीठाचे कोणतेही प्राधिकरण किंवा मंडळ किंवा समिती यांनी घेतलेला निर्णय किंवा संमत केलेला ठराव हा कुलगुरूच्या मते, अधिनियम, परिनियम, आदेश यांच्या तरतुदींशी सुसंगत नसेल किंवा विद्यापीठाच्या हिताचा नसेल तर, आणि तो ही बाब कुलाधिपतीकडे निर्णयार्थ सादर करील तेव्हा कुलाधिपती त्या बाबीवर निर्णय देईल आणि कुलगुरूला योग्य ते निदेश देईल: कलम 14 (6)

कुलाधिपती, व्यवस्थापन परिषदेवर एका व्यक्तीचे नामनिर्देशन करील : कलम 25 (2) (चार)

कुलाधिपती, विद्यापरिषदेवर राज्य संस्कृत परिसंस्थेमधील दोन विद्याव्यासंगी व्यक्ती नामनिर्देशित करील: कलम 27 (2) (त्र)

कुलाधिपतीला, विद्यापीठाने तयार केलेल्या परिनियमांना अनुमती देता येईल: कलम 45 (3)

कुलाधिपतीकडून अनुमती देण्यात येईपर्यंत कोणताही परिनियम विधिग्राह्य ठरणार नाही: कलम 45 (4)

कुलाधिपतीस, स्वत: होऊन किंवा राज्य शासनाच्या सल्ल्यावरून तो विनिर्दिष्ट केलेल्या अशा कोणत्याही बाबीच्या संबंधात परिनियम करण्याविषयी विद्यापीठाला निदेश करता येईल आणि असे निदेश प्राप्त झाल्यापासून आठ दिवसांच्या आत त्यांची अंमलबजावणी करण्यात व्यवस्थापन परिषद अपयशी ठरली तर, कुलाधिपती व्यवस्थापन परिषदेने अशा निदेशांची अंमलबजावणी करणे तिला शक्य न झाल्याबद्दलची कोणतीही कारणे कळविली असतील तर, कारणांचा विचार केल्यानंतर, योग्य असे परिनियम करता येतील किंवा त्या परिनियमात योग्य अशा सुधारणा करता येतील: कलम 45 (5)

विद्यापीठाने तयार केलेल्या आदेशांना कुलाधिपती मान्यता देईल: कलम 47 (4)

कुलाधिपती विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यास विलंब झाल्याबाबतची कारणे विद्यापीठाकडून मागवू शकतात: कलम 51

कुलाधिपतीने प्रत्यक्ष प्रतिकूल परिणाम झालेल्या कोणत्याही व्यक्तीच्या विनंती अर्जावर किंवा स्वत: होऊन, चौकशी केल्यानंतर आणि ज्या अध्यापकांच्या नियुक्तीवर परिणाम होण्याची शक्यता असेल अशा अध्यापकांच्या स्पष्टीकरणासह स्पष्टीकरण मिळाल्यानंतर कुलाधिपतीची अशी खात्री पटली की, विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाने केलेली विद्यापीठाच्या अध्यापकाची नियुक्ती ही त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्यानुसार नव्हती तर, कुलाधिपती, त्या अध्यापकाला एक महिन्याची नोटीस दिल्यानंतर किंवा अशा नोटीशीच्या ऐवजी एक महिन्याचे वेतन दिल्यानंतर त्याची नियुक्ती समाप्त करण्याचा निदेश कुलगुरूला देऊ शकेल: कलम 55 (7)

कलम 55 (7) अन्वये कुलाधिपतीने काढलेला आदेश अंतिम असेल: कलम 55 (8)

व्यवस्थापन परिषद व विद्वत् परिषद यांनी केलेल्या शिफारशीवरून कुलाधिपतीला, एखाद्या व्यक्तीला नैतिक अध:पाताचा ज्यात अंतर्भाव होतो अशा अपराधाबद्दल न्यायालयाने दोषी ठरविले असल्यास त्या व्यक्तीची पदवी / पदविका / प्रमाणपत्र अथवा इतर कोणतीही विद्याविषयक विशेषोपाधी काढून घेण्याचा अधिकार असेल: कलम 75 (2)

व्यवस्थापन परिषदेसमोर तिच्या विचारार्थ ठेवण्यापूर्वी सन्मान्य पदवी प्रदान करण्याबाबतच्या प्रस्तावांना कुलाधिपती मान्यता देईल: कलम 76

व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीवरून कुलाधिपतीस, नैतिक अध:पाताचा ज्यात अंतर्भाव होतो अशा अपराधाबद्दल न्यायालयाने एखाद्या व्यक्तीस दोषी ठरविले असल्यास, अशा व्यक्तीचे नाव पदवीधराच्या नोंदवहीतून काढून टाकण्याचा अधिकार असेल: कलम 79

कुलगुरूने किंवा प्रत्यक्ष प्रतिकूल परिणाम झालेल्या कोणत्याही व्यक्तीने दिलेल्या संदर्भावरून कुलाधिपतीस अधिनियम, परिनियम, आदेश, विनियम किंवा नियम यांच्या तरतुदींच्या अर्थउकलीचा आणि विनंती अर्जावर निर्णय देण्याचा `अधिकार` कुलाधिपतीस असेल: कलम 86

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, 1998

 

कुलपती हा विद्यापीठाचा प्रमुख आहे आणि अधिसभेचा अध्यक्ष आहे आणि उपस्थित असेल तेव्हा अधिसभेच्या बैठकीचे आणि विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षपद स्वीकारेल: कलम 10 (2)

कुलपतीस विद्यापीठाच्या कोणत्याही कारभाराशी संबंधित अशी माहिती व अभिलेख मागविता येतील आणि विद्यापीठाच्या हिताच्या दृष्टीने त्यास योग्य वाटतील असे निदेश देता येतील आणि विद्यापीठाची प्राधिकरणे व अधिकारी अशा निदेशांचे पालन करतील: कलम 10 (3)

कुलपतीस, कुलगुरूकडून लेखी अहवाल घेतल्यानंतर कोणत्याही प्राधिकरणाचा, निकायाचा, समितीचा किंवा अधिकाऱ्याचा कोणताही ठराव, आदेश किंवा कामकाज हे कुलपतीच्या मते या अधिनियमाशी किंवा त्याखाली केलेल्या परिनियमांशी, आदेशांशी किंवा विनियमांशी सुसंगत नसेल किंवा विद्यापीठाच्या हिताचे नसेल तर ते स्थगित करता येतील किंवा त्यात फेरफार करता येईल आणि विद्यापीठाचे प्राधिकरण, निकाय, समिती व अधिकारी त्याचे पालन करतील: कलम 10 (4)

निवडून दिलेल्या / नामनिर्देशित केलेल्या / नियुक्त केलेल्या / स्वीकृत केलेल्या कोणत्याही सदस्याचे वर्तन, विद्यापीठाचे किंवा कोणत्याही प्राधिकरणाचे किंवा निकायाचे किंवा समितीचे कामकाज सुरळीत चालण्यास बाधक ठरत असेल तेव्हा कुलपतीस, अशा सदस्यास, त्याचे लेखी स्पष्टीकरण देण्याची संधी दिल्यानंतर व अशा प्रकारचे कोणतेही स्पष्टीकरण मिळाल्यास, त्यावर विचार करून आणि असे करणे आवश्यक आहे याबद्दल स्वत:ची खात्री करून घेतल्यानंतर, अशा सदस्यास त्याला योग्य वाटेल तेवढ्या कालावधीकरिता अपात्र ठरविता येईल किंवा त्याला निलंबित करता येईल:कलम 10 (5)

विद्यापीठाची आणि त्याच्या मालमत्तेची तपासणी करण्याचा कुलपतीस हक्क असेल: कलम 10 (6)

निवड समितीच्या शिफारशीवरून कुलपती कुलगुरूंची नियुक्ती करील: कलम 14 (1)

कुलपती, सहा महिन्यांहून अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी स्थानापन्न कुलगुरूची नियुक्ती करील: कलम 14 (7)

कुलपती, कुलगुरूशी विचारविनिमय करून प्रती कुलगुरूची नियुक्ती करील: कलम 15 (1)

कुलगुरूने आपल्या आकस्मिक अधिकारान्वये केलेल्या कार्यवाही संदर्भात कुलगुरू आणि कोणतेही प्राधिकरण किंवा मंडळ यांच्या दरम्यान कोणतेही मतभेद उदभवल्यास, कुलपती याबाबीवर निर्णय देईल: कलम 16 (6)

कुलपती, अधिसभेवर सहा व्यक्ती नामनिर्देशित करील : कलम 23 (2) (न)

कुलपती, अधिसभेवर महाविद्यालयाच्या 6 प्रमुखांना नामनिर्देशित करील: कलम 23 (2) (र)

कुलपती, कुलगुरूने शिफारस केल्याप्रमाणे अधिसभेच्या बैठकीच्या दिनांकास/दिनांकांना मान्यता देईल: कलम 24 (1)

कुलपती, व्यवस्थापन परिषदेवर एका व्यक्तीचे नामनिर्देशन करील: कलम 26 (1) (सहा)

कुलपती, आरोग्य विज्ञान क्षेत्रातील चार तज्ञ व्यक्तींचे व्यवस्थापन परिषदेवर नामनिर्देशन करील: कलम 26 (1) (नऊ)

कुलपती, आरोग्य विज्ञान क्षेत्रातील दोन मान्यवर तज्ञांचे विद्यापरिषदेवर नामनिर्देशन करील: कलम 28 (2) (के)

विद्यापीठाने तयार केलेल्या परिनियमांना कुलपती मान्यता देईल: कलम 49 (4)

कुलपतीने अनुमती दिल्याशिवाय कोणतेही परिनियम विधिग्राह्य ठरणार नाहीत: कलम 49 (5)

कुलपतीस, त्यांनी विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही बाबींसंबंधात परिनियमात तरतूद करण्याचे विद्यापीठाला निदेश देण्याचा अधिकार असेल. या निदेशांचे साठ दिवसांच्या आत अनुपालन न केल्यास, त्याला योग्य ते परिनियम करता येतील किंवा त्यात सुधारणा करता येतील: कलम 49(6)

विद्यापीठाने तयार केलेल्या आदेशांना कुलपती मान्यता देईल: कलम 50 (4)

कुलपती, विद्यापीठाकडून विद्यापीठांच्या परीक्षांचा निकाल घोषित करण्यास विलंब झाल्याबाबतची कारणे विद्यापीठाकडून मागवू शकतो: कलम 56

कुलपती, अध्यापकांची नेमणूक करण्यासाठी असलेल्या निवड समितीवर दोन व्यक्तींचे नामनिर्देशन करील: कलम 60 (2) (ब)

कुलपती, विद्यापीठाच्या अध्यापकांची नेमणूक करण्यासाठी असलेल्या निवड समितीवर, मागासवर्गातील प्रतिनिधित्वासह एक व्यक्तीचे नामनिर्देशन करील: कलम 60 (2) (फ)

कुलपतीने, प्रत्यक्ष प्रतिकूल परिणाम झालेल्या कोणत्याही व्यक्तीच्या विनंती अर्जावरून किंवा स्वत: होऊन, चौकशी केल्यानंतर आणि ज्या अध्यापकाच्या नियुक्तीवर परिणाम होण्याची शक्यता असेल अशा व्यक्तीकडून घेतलेल्या स्पष्टीकरणासहीत अशी स्पष्टीकरणे मिळवल्यानंतर कुलगुरूंची अशी खात्री पटली की, विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाने केलेली विद्यापीठाच्या अध्यापकाची नियुक्ती त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्यानुसार नव्हती, तर कुलपतीस, त्या अध्यापकाला एक महिन्याची नोटीस दिल्यानंतर किंवा अशा नोटिशीऐवजी एक महिन्याचे वेतन दिल्यानंतर त्याची नियुक्ती समाप्त करण्याचा निदेश कुलगुरूला देता येईल: कलम 60 (7)

नैतिक अध:पाताचा ज्यात अंतर्भाव होतो अशा अपराधाबद्दल एखाद्या व्यक्तीला न्यायालयाने दोषी ठरवले असेल तर, कुलपतीस, व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषद यांच्या शिफारशीवरून, त्या व्यक्तीची पदवी/पदविका/प्रमाणपत्र किंवा अन्य कोणतीही विद्याविषयक विशेषोपाधी कायमची किंवा कुलपतीस योग्य वाटेल अशा मुदतीसाठी काढून घेता येईल: कलम 78 (2)

सन्मान्य पदवी प्रदान करण्याबाबतचे प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवण्यापूर्वी, कुलपती प्रस्तावांना मान्यता देईल: कलम 79 (1)

नैतिक अध:पाताचा अंतर्भाव होतो अशा स्वरूपाच्या असलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवले असेल तर, कुलपतीस, व्यवस्थापन परिषद आणि अधिसभा यांच्या शिफारशीवरून अशा व्यक्तीचे नाव पदवीधरांच्या नोंदवहीतून काढून टाकण्याचा अधिकार आहे: कलम 82 (1)

कुलगुरूने दिलेल्या संदर्भावरून कुलपतीस अधिनियम, परिनियम, आदेश, विनियम यांच्या तरतुदींच्या अर्थउकलीचा आणि निर्णय देण्याचा अधिकार असेल: कलम 89

महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनिमय, 1998

 

कुलपतीस, विद्यापीठाची इमारत इत्यादीच्या तपासणीची व्यवस्था करण्याचा अधिकार असेल: कलम 11 (1)

कुलपती, अशा तपासणीचे निष्कर्ष विद्यापीठाला कळविल्यानंतर, त्यावरील कार्यकारी परिषदेची मते मागवील, कार्यकारी परिषदेने विनिर्दिष्ट कालमर्यादेत मत कळविण्यास कसूर केल्यास निश्चित केलेल्या कालमर्यादेत कार्यकारी परिषदेने कार्यवाही करण्याविषयी कार्यकारी परिषदेला सल्ला देण्याचे अधिकार कुलपतीला असतील: कलम 11 (3)

निश्चित केलेल्या मुदतीच्या आत, कुलपतीचे समाधान होईल अशारीतीने कारवाई करण्यात कार्यकारी परिषदेने कसूर केल्यास कार्यकारी परिषदेला निदेश देण्याचा अधिकार कुलपतीस असेल: कलम 11 (5)

विद्यापीठाचे प्रशासन व वित्त व्यवस्था याच्याशी संबंधित असेल अशी माहिती मागवून घेण्याचा अधिकार कुलपतीस असेल: कलम 11 (7)

राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती असतील: कलम 14 (1)

कुलपती हा, त्याच्या पदपरत्वे विद्यापीठाचा प्रमुख असेल: कलम 14 (2)

सन्मान्य पदवी प्रदान करण्याच्या प्रस्तावास, कुलपती मान्यता देईल: कलम 14 (4)

हा अधिनियम, त्याआन्वये केलेले परिनियम, आदेश आणि विनियम यांच्याशी सुसंगत नसणारा किंवा विद्यापीठाच्या हितसंबंधास बाधक असणारा असा विद्यापीठाचा कोणताही अधिकारी किंवा प्राधिकरण याचा कोणताही ठराव, आदेश किंवा कार्यवाही कुलपती स्थगित ठेवू शकतो किंवा फेरबदल करू शकतो : कलम 14 (5)

निवड समितीच्या शिफारशीवरून कुलपती कुलगुरूची नियुक्ती करतो: कलम 16 (1),

नेमणूक करण्याच्या प्रयोजनार्थ घटित केलेली समिती विहित मुदतीत नामिका सादर करण्यास अपयशी ठरल्यास कुलपतीस, कोणत्याही योग्य व्यक्तीची कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकार असेल: कलम 16 (2)

कुलपतीस, कलम 7 अन्वये प्रतिकुलपतीकडून देण्यात आलेल्या निदेशांची अंमलबजावणी करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्यास कुलगुरूने हयगय केली आहे किंवा कसूर केली आहे, या कारणावरून प्रतिकुलपतीने केलेल्या शिफारशीवरून आदेशाद्वारे कुलगुरू कोणत्याही वेळी पदावरून काढून टाकता येईल: कलम 16 (6) (अ)

कुलगुरू, या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करीत नसेल किंवा तसे करण्यास नकार देत असेल तर किंवा त्याच्याकडे निहित असलेल्या अधिकारांचा दुरूपयोग करीत असेल तर, आणि त्याचे कुलगुरू पदावर असण्याचे चालू राहणे हे विद्यापीठाच्या हितसंबंधास बाधक ठरत असेल तर, कुलपती कोणत्याही वेळी, कुलगुरूस पदावरून काढू शकतो: कलम 16 (6) (ब)

कुलपती सहा महिन्यांहून अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी कुलगुरूची स्थानापन्न नियुक्ती करील: कलम 16 (8)

कुलपती, कार्यकारी परिषदेवर एका व्यक्तीचे नामनिर्देशन करील: कलम 26 (1) (नऊ)

कुलगुरू, कार्यकारी परिषदेवर दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय व कुक्कुटपालन उद्योगातील प्रत्येकी एका तज्ञ व्यक्तीला नामनिर्देशित करील: कलम 26 (1) (सतरा)

कुलपती, कार्यकारी परिषदेवर एका मान्यवर समाजसेवकाचे नामनिर्देशन करील: कलम 26 (1)(अठरा)

कुलपती, विद्यापीठाच्या परिनियमांना संमती देईल: कलम 34 (4)

कुलपती संमती देईपर्यंत कोणताही परिनियम वैध असणार नाही: कलम 34 (5)

कुलगुरूने विचारार्थ पाठविलेल्या प्रश्नावर किंवा प्रत्यक्ष परिणाम झालेल्या व्यक्तीच्या विनंती अर्जावरून, कुलपतीस, अधिनियमाच्या, परिनियमाच्या, आदेशाच्या, विनियमाच्या किंवा नियमाच्या तरतुदींची अर्थउकल करण्याचा अधिकार असेल: कलम 55